Akola congress leader Abhay Patil met Eknath Shinde Shivsena leader : समर्थकांच्या बैठकीनंतर निर्णयाची शक्यता; अकोल्याचे राजकीय समीकरण बदलणार
Akola अकोल्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींना आता वेग आला आहे. काँग्रेसचे माजी लोकसभा उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्या टॉवर चौकातील निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अॅड. निलेश देशमुख यांनी भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे दोन तास बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीनंतर अकोल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
डॉ. अभय पाटील यांनी काही काळापूर्वी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी अद्याप कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही. मात्र, अलीकडेच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत तर्कवितर्क सुरू झाले होते.
याच पार्श्वभूमीवर अॅड. निलेश देशमुख यांनी थेट अकोल्यात येऊन डॉ. पाटील यांची भेट घेतल्याने शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशाच्या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. दोघांनी चर्चेनंतर एकत्र भोजन केल्याचीही माहिती असून, त्यामुळे या भेटीची राजकीय चर्चा रंगली आहे.
Yashomati Thakur : दम असेल तर राजीनामे द्या, पुन्हा निवडून येऊन दाखवा; यशोमती ठाकूर यांचे आव्हान
डॉ. पाटील पुढील दोन दिवसांत आपल्या समर्थकांची बैठक घेणार असल्याचे समजते. या बैठकीनंतर ते आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉ. अभय पाटील नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे अकोल्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
२०२४च्या अकोला लोकसभा निवडणुकीत डॉ. अभय पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर ४ लाख १६ हजार ४०४ मते मिळवत दुसरे स्थान पटकावले होते. भाजपचे अनुप धोत्रे ४ लाख ५७ हजार ३० मते मिळवून ४० हजार ६२६ मतांनी विजयी झाले होते. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर २ लाख ७६ हजार ७४७ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होते.
Sajid Khan Pathan : ‘मीदेखील काँग्रेसचा कार्यकर्ता’ म्हणत आमदाराचे एकजुटीचे आवाहन
या निवडणुकीतील मतांची संख्या आणि डॉ. पाटील यांचा अकोल्यातील राजकीय प्रभाव लक्षात घेता, त्यांच्या पुढील निर्णयाचा आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.








