Akola City Congress Committee meeting; appointment letters distributed to newly appointed office-bearers : अकोला महानगर काँग्रेस कमिटीची बैठक; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप
Akola अकोला महानगर काँग्रेस कमिटीची बैठक १५ ऑगस्ट रोजी दुपारी स्वराज्य भवन येथे महानगराध्यक्ष महेंद्र गवई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला माजी मंत्री खान मोहम्मद अझहर हुसेन, अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण, अकोला जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश तायडे, प्रदेश सचिव अक्षय राऊत, मोहम्मद यासीन आणि लाला पठाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मंजूर केलेल्या महानगर काँग्रेस कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक कामाबाबत मार्गदर्शन केले.
माजी मंत्री खान मोहम्मद अझहर हुसेन यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. आमदार साजिद खान पठाण यांनी संघटनेचे महत्त्व अधोरेखित करत आगामी काळात सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. ‘मीदेखील काँग्रेस संघटनेचा कार्यकर्ता असून, संघटनेचे सर्व नियम मलाही लागू होतात,’ असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविले.
जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश तायडे यांनीही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत संघटनात्मक कामाबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात महेंद्र गवई यांनी पाचही ब्लॉक अध्यक्षांना आपापल्या ब्लॉकमध्ये संघटन सक्रिय करण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रत्येक महिन्याला मासिक आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Sameer Wankhede : ‘तुकाराम मुंढे फार काही वेगळं काम करत नाहीत’
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती ‘सृजन’ संघटनात्मक प्रक्रियेतून झाली असून, त्यांच्या कामाची नोंद प्रदेश काँग्रेस कमिटीकडून वेळोवेळी घेतली जाणार असल्याचेही गवई यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ उपाध्यक्ष कपिल रावदेव यांनी केले, तर पूर्व ब्लॉकचे विनोद नालट यांनी आभार मानले.








