Congress condemns the purification of the stage where Mallikarjun Kharge’s rally was held : काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन, कारवाईची मागणी
Amravati काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर झालेल्या सभेनंतर काही व्यक्तींनी मंचाचे ‘शुद्धीकरण’ केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अमरावती काँग्रेसने केली.
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांना निवेदन देऊन या प्रकरणी कारवाईची मागणी केली. खरगे दलित समाजातील असल्यामुळेच मंचाचे ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. स्वातंत्र्याला ८० वर्षे उलटूनही जातीयवादी विचारसरणी समाजात अस्तित्वात असल्याचे या घटनेतून दिसून येते, असे काँग्रेसने म्हटले.
Abhay Patil : शिंदे गटाच्या नेत्याची भेट, दोन तास चर्चा, अभय पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशात समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा विचार रुजवला. मात्र, अशा घटना घडत असतील तर सामाजिक समतेच्या मूल्यांना धक्का पोहोचत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने व्यक्त केली. अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजमनाला वेदना होत असून, दोषींवर तातडीने कारवाई करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी माजी महापौर अशोक डोंगरे, ॲड. पी. एस. खडसे, डॉ. बी. आर. देशमुख, प्राचार्य गोपीचंद मेश्राम, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस प्रा. डॉ. सुजाता झाडे, युवक काँग्रेसचे समीर जवंजाळ, प्रा. अनिल देशमुख, भैय्यासाहेब निचळ, वैभव देशमुख, राजाभाऊ चौधरी, माजी नगरसेवक विजय वानखडे, गोपाल धर्माळे, अविनाश मेश्राम, आशिष यादव, प्रियल मोहोड, धनंजय बोबडे आणि कुणाल गावंडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Sajid Khan Pathan : ‘मीदेखील काँग्रेसचा कार्यकर्ता’ म्हणत आमदाराचे एकजुटीचे आवाहन
अपर जिल्हाधिकारी दानेज यांच्याशी संवाद साधताना बोरकर यांनी आधुनिक काळातही जातीय भेदभावाच्या घटना घडणे ही समाजाची शोकांतिका असल्याचे सांगितले. अशा घटनांमुळे मानवतेला काळिमा फासला जात असून, त्यांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.








