व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण District Women Hospital Dafrin hospital : फायर, इलेक्ट्रिक ऑडिटसह पीडब्ल्यूडी अभियंत्यांची झाडाझडती

District Women Hospital Dafrin hospital : फायर, इलेक्ट्रिक ऑडिटसह पीडब्ल्यूडी अभियंत्यांची झाडाझडती

Chandrashekhar Bawankule pulls up PWD engineers over fire and electrical audits : डफरिन रुग्णालय दुर्घटनेप्रकरणी पालकमंत्री बावनकुळे आक्रमक; तीन कुटुंबांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

Amravati डफरिन रुग्णालयातील दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. अहवालात दोषी आढळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यासोबतच गुन्हेही दाखल केले जातील. तसेच रुग्णालयासाठी यापूर्वी खर्च झालेल्या सुमारे सहा कोटी रुपयांच्या निधीचा हिशेबही तपासला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.

डफरिन रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून, नवजात बालकांचे प्राण वाचवता न आल्याचे दुःख आहे, असे बावनकुळे म्हणाले. घटनेची माहिती सोमवारी पहाटे साडेपाच वाजता मिळताच मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना तत्काळ माहिती देऊन अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. त्याच दिवशी आरोग्यमंत्री अमरावतीत दाखल झाले होते.

‘डफरिन’चा डीपीसीकडे एकही प्रस्ताव नाही
डफरिन रुग्णालयासंबंधी जिल्हा नियोजन समितीकडे सध्या कोणताही प्रस्ताव नाही, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. यापूर्वी २०२४ मध्ये २ कोटी ६३ लाख रुपये आणि २०२५ मध्ये ३ कोटी ७६ लाख रुपये, असे एकूण सुमारे ६ कोटी ३९ लाख रुपये आवश्यक उपकरणांसाठी खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एवढा निधी उपलब्ध करूनही दुर्घटना घडल्याने या खर्चाची आणि त्यातून करण्यात आलेल्या कामांची निश्चितपणे चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

फायर, इलेक्ट्रिक ऑडिट का झाले नाही?

डफरिन रुग्णालयाचे फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिक ऑडिट का झाले नाही, याची चौकशी सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचीही चौकशी केली जाणार आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांच्या विभागाकडून स्वतंत्र समिती गठित करून चौकशी करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

SIR program : अकोला जिल्ह्यातील २.७७ लाख मतदार गेले कुठे?; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी

‘शासनाने निधीची कमतरता ठेवलेली नाही. मात्र, फायर आणि इलेक्ट्रिक ऑडिटसाठी अधिकारी गेले का नाहीत, याची जबाबदारी निश्चित केली जाईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘पीडब्ल्यूडीचे अभियंते लपवाछपवी करीत आहेत’

डफरिनच्या ‘सीएस’ यांनी पत्र दिलेले असतानाही इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिटसाठी संबंधित अधिकारी आले नसल्याचा दावा बावनकुळे यांनी केला. ‘पीडब्ल्यूडीचे अभियंते लपवाछपवी करीत आहेत,’ असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाचीही चौकशी केली जाईल. उच्चस्तरीय समितीचा अहवाल मंगळवारी शासनाला सादर होणार असून, त्यात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
‘एम्स’च्या धर्तीवर डफरिनची पुनर्रचना

भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा घडू नये, यासाठी डफरिन रुग्णालयात अतिउच्च दर्जाच्या सुविधा उभारण्यात येणार आहेत. ‘एम्स’च्या धर्तीवर रुग्णालयाची पुनर्रचना करण्याचा विचार असून, यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना ‘सीएस’ यांना दिल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

डफरिन रुग्णालयातील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तीन नवजात बालकांच्या पालकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते देण्यात आले.

Cjp march : कॉकरोच जनता पार्टीच्या मोर्चाला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

दरम्यान, दुर्घटनेतील ३६ बालकांवर अमरावतीतील चार खासगी रुग्णालयांत उपचार सुरू असून, पालकमंत्र्यांनी या बालकांची भेट घेतली. संबंधित चारही खासगी रुग्णालयांनी बालकांवर पूर्णपणे मोफत उपचार केल्याबद्दल त्यांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले.
पत्रपरिषदेला खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे-पाटील, आमदार रवी राणा, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!