Government to file culpable homicide cases against those responsible for the fire at Amravati District Women’s Hospital : अमरावतीतील जिल्हा स्त्री रुग्णालय प्रकरणी दोषींबाबत कठोर भूमिका
Nagpur अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात घडलेली आगीची दुर्घटना अत्यंत गंभीर असून, चौकशीत दोषी आढळणाऱ्या एकाही व्यक्तीला पाठीशी घातले जाणार नाही. गरज भासल्यास दोषींवर थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा कडक इशारा महसूल मंत्री तथा नागपूर-अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
पालकमंत्री बावनकुळे यांनी सोमवारी अमरावती येथे भेट देऊन प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली. “गेल्या वर्षी या रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. निधी मिळूनही ही दुर्दैवी घटना कशी घडली, याची सखोल चौकशी सुरू असून, या तपासाचा अहवाल आज-उद्या प्राप्त होईल,” असे बावनकुळे म्हणाले.
या दुर्घटनेत ज्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्याचा दावा केला जात आहे, त्याच्या पुरवठ्याचीही चौकशी केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२०२२ मध्ये हाफकिन इन्स्टिट्यूटमार्फत राज्यभरात सुमारे १० हजार व्हेंटिलेटर पुरवण्यात आले होते. अमरावतीच्या रुग्णालयात नेमके कोणते व्हेंटिलेटर बसवले गेले होते आणि स्फोटामागील मूळ कारण काय, याची वस्तुस्थिती तपासूनच अंतिम निष्कर्ष काढला जाईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. याशिवाय, वनहक्क धारकांना लवकरच सातबारा आणि ८-अ उतारे दिले जातील, असेही त्यांनी नमूद केले. या अग्नितांडवात तीन बालकांचा नाहक बळी गेला. 66 मुलांचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे.








