व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home क्राईम Shobha Bachhav : खासदाराचा फोन हॅक करून पैसे उकळण्याचा प्रयत्न !

Shobha Bachhav : खासदाराचा फोन हॅक करून पैसे उकळण्याचा प्रयत्न !

shobha-bachhav-mobile-hack-62000-whatsapp-message-cyber-fraud : ‘माझ्या खात्यात ६२ हजार भरा, दोन तासांत परत करते’, सायबर भामट्यांचा प्रताप

Dhule : सामान्य नागरिकांचा मोबाईल हॅक करून फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यांनी आता थेट खासदारांच्या मोबाईलवरच हात साफ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल हॅक करून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना व्हॉट्सॲपवरून पैशांची मागणी करण्यात आली. ‘माझ्या खात्यात ६२ हजार रुपये जमा करा, दोन तासांत परत करते’, असा मेसेज गेल्याने एकच खळबळ उडाली.

विशेष म्हणजे हा प्रकार एखाद्या थेट बँकिंग व्यवहारातून नव्हे, तर नेहमीच्या ‘कुरिअर आले आहे’ या आमिषातून सुरू झाल्याची माहिती आहे. डॉ. बच्छाव यांचा मोबाईल त्यांच्याकडे नसून त्यांच्या पीएकडे होता. त्याचवेळी एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. ‘तुमचे कुरिअर आले आहे, मात्र पत्ता सापडत नाही. लिंक पाठवली आहे, ती उघडून तपासा,’ असे सांगण्यात आले. लिंक उघडली आणि काही वेळातच सायबर भामट्यांनी मोबाईलचा ताबा घेतल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर खासदारांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील अनेकांना त्यांच्या नावाने संदेश जाऊ लागले. काहींना थेट ६२ हजार रुपये मागण्यात आले, तर काहींना ‘हेल्प मी’ असा संदेश पाठवण्यात आला.

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून विखे-पाटील टार्गेटवर

इथेच सायबर फसवणुकीचा खरा धोका दिसून आला. अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजकडे दुर्लक्ष करणे सोपे असते; पण तोच मेसेज आपल्या परिचित व्यक्तीच्या किंवा खासदारांच्या नंबरवरून आला तर विश्वास बसण्याची शक्यता अधिक असते. सायबर भामट्यांनी याच विश्वासाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. प्रकार लक्षात येताच डॉ. शोभा बच्छाव यांनी तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू करून काही वेळातच मोबाईल पुन्हा सुरक्षित केल्याची माहिती आहे. पैसे पाठवण्यापूर्वी काही संपर्कांनी थेट खासदारांशी संपर्क साधल्याने मोठी आर्थिक फसवणूक टळल्याचेही समोर आले आहे.

या घटनेनंतर पुन्हा स्पष्ट झाले आहे की, सायबर भामट्यांसाठी आता कोणीही ‘व्हीआयपी’ राहिलेला नाही. कुरिअर, बँक, केवायसी, सरकारी कागदपत्रे किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने येणारी एक लिंकही मोठा धोका ठरू शकते. मेसेज ओळखीच्या नंबरवरून आला म्हणून तो खरा असेलच असे नाही; आणि लिंक कुरिअरची असेल म्हणून ती पार्सलचीच असेल असेही नाही! खासदारांच्या मोबाईलपर्यंत पोहोचलेल्या या सायबर भामट्यांनी पैसे उकळण्याचा प्रयत्न केला; आता त्यांचा माग काढण्याचे आव्हान सायबर पोलिसांसमोर आहे.

error: Content is protected !!