Anil Deshmukh alleges commercialization of the Marbat festival : मारबत उत्सवाचे बाजारीकरण केल्याचा आरोप, महापालिका आयुक्तांना विचारला जाब
Nagpur सुमारे दीडशे वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या आणि नागपूरकरांचा जनआक्रोश मांडणाऱ्या ऐतिहासिक मारबत महोत्सवाचे महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी ‘स्पॉन्सरशिप’ आणि ‘इव्हेंटबाजी’च्या नावाखाली बाजारीकरण केले आहे. मारबत आणि बडग्यांच्या माध्यमातून सरकारविरोधात व्यक्त होणारा सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला आहे, असा घणाघाती आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी नागपूर महापालिका आयुक्तांना पत्र लिहून सत्ताधाऱ्यांच्या मनमानीवर थेट खडे बोल सुनावले आहेत.
ब्रिटिशांच्या काळातील जमावबंदीचे आदेश झुगारून देत त्यांच्या अन्यायाविरुद्ध रोष व्यक्त करण्यासाठी मारबत महोत्सवाची सुरुवात झाली होती. ‘घेऊन जा गे मारबत…’ या घोषणांनी स्वातंत्र्यलढ्याला मोठी ताकद दिली. स्वातंत्र्यानंतरही सरकारचे कान उघाडण्याचे काम मारबत आणि बडग्यांच्या मिरवणुकीतून केले जात होते. मात्र, भाजप सत्तेत आल्यापासून ऐतिहासिक परंपरांचे इव्हेंटमध्ये रूपांतर केले जात असून, स्वतःच्या सरकारविरोधात एकही शब्द बाहेर येऊ नये, अशी दडपशाही सुरू आहे, असा आरोप देशमुखांनी केला.
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांची पहिलीच सही सतीश शिंदेंच्या नियुक्तीपत्रावर!
या वर्षी महापालिकेने मारबत महोत्सवावर तब्बल दोन कोटी रुपयांचा खर्च केला आणि बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले. ‘नीट’ परीक्षा घोटाळा, एमपीएससी विद्यार्थ्यांचा आक्रोश, महागाई, इंधनाचे भडकलेले दर, आरक्षणाचा प्रश्न, आदिवासी विद्यार्थ्यांची दुर्दशा आणि शहरातील खड्डे-वृक्षतोड यांसारख्या गंभीर मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठीच हा पर्यटनाचा बनाव रचला गेला, असा थेट हल्ला देशमुखांनी चढवला. पर्यटन आणि इव्हेंटच्या नावाखाली नागपूरच्या या ऐतिहासिक परंपरेचा गळा घोटू नका आणि नागरी प्रश्नांना छेद देऊ नका,” असा इशारा अनिल देशमुख यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रातून दिला आहे.








