व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण शिंदे सेनेचे ७ पदाधिकारी निघाले खंडणीखोर; १२ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

शिंदे सेनेचे ७ पदाधिकारी निघाले खंडणीखोर; १२ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

गुन्हा दाखल करून घेण्यात हयगय; पोलिसांवर निलंबनाची कारवाई

Nagpur उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील सात पदाधिकाऱ्यांवर १२ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सत्ताधारी पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने नागपूरसह संपूर्ण राजकीय वर्तुळात आणि शिवसैनिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पाचपावली पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिरुद्ध पुरी यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कामठी रोडवरील टेकानाका परिसरातील होप इस्पितळात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा गैरफायदा घेत शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन प्रचंड गोंधळ घातला. तेथे तोडफोड करण्याची आणि रुग्णालयाची बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांनी १२ लाख रुपयांची खंडणी मागितली. या १२ लाखांपैकी २ लाख रुपये मृत रुग्णाच्या नातेवाईकांना देऊन उर्वरित १० लाख रुपये स्वतः ठेवण्याचा या पदाधिकाऱ्यांचा डाव होता. याप्रकरणी युवा सेना अध्यक्ष शरद सरोदे, महिला सेना अध्यक्ष मनिषा पापडकर, युवा सेनेचे पदाधिकारी मुल्लासिंग गौर, उपजिल्हा प्रमुख पंकज खिंची, प्रतिक बहुगुणा, महेश ढोले आणि शुभम साठे या सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वर्ध्याला पालकमंत्र्यांकडून मोठं ‘गिफ्ट’; एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राला मंजुरी, ४४६ पदांची निर्मिती

इस्पितळाचे संचालक डॉ. मुरली बालसुंदरम यांनी खंडणी देण्याऐवजी थेट पाचपावली पोलीस स्टेशन गाठले. मात्र, आरोपी सत्ताधारी पक्षाचे असल्याने पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. डॉ. बालसुंदरम यांनी ही बाब थेट पोलीस आयुक्तांच्या कानावर घातली. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कडक पावले उचलली. त्यामुळे ठाणेदाराचा नाईलाज झाला आणि आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पाचपावली पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिरुद्ध पुरी यांना पोलीस आयुक्तांनी तात्काळ निलंबित केले.

पदवीधरांच्या प्रश्नांसाठी कराळे मास्तरांचा अचानक ‘क्लास’!

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये प्रमुख आरोपी असलेल्या मनिषा पापडकर या सुरुवातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) कार्यरत होत्या. त्यांनी मनसेकडून महापालिकेची निवडणूकही लढवली होती. राज ठाकरे यांनी विदर्भातील कार्यकारिणीत बदल केल्यानंतर त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला होता आणि पक्षाने त्यांच्याकडे महिला सेना अध्यक्षपदाची धुरा सोपवली होती. राज्यात महायुतीची सत्ता असून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. अशा वेळी त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी इस्पितळात जाऊन खंडणी उकळत असल्याचे समोर आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात असून, पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

 

error: Content is protected !!