गडचिरोली दौऱ्याने राजकीय चर्चेला उधाण
Gadchiroli : पदवीधरांच्या विविध प्रश्नांवर संवाद साधण्यासाठी वर्धेचे नीतेश कराळे मास्तर अचानक गडचिरोलीत दाखल झाले आणि त्यांच्या दौऱ्याची शहरात चांगलीच चर्चा रंगली. आपल्या खास वऱ्हाडी शैलीतील संवादातून त्यांनी रोजगार, स्पर्धा परीक्षा, नोकरीच्या संधी, उच्च शिक्षण तसेच परीक्षा केंद्रांसह पदवीधरांशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली. मात्र, नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जवळ येत असताना हा ‘क्लास’ सुरू झाल्याने त्यामागील राजकीय संदर्भाबाबतही स्थानिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.
गडचिरोलीतील पदवीधरांच्या प्रश्नांची यादी मोठी आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या मर्यादित संधी, स्पर्धा परीक्षांची तयारी, परीक्षांसाठी आवश्यक सुविधा, स्थानिक पातळीवर परीक्षा केंद्रांची उपलब्धता आणि उच्च शिक्षणाच्या संधी हे प्रश्न सातत्याने चर्चेत असतात. याच विषयांवर कराळे मास्तरांनी पदवीधरांशी संवाद साधत त्यांचे म्हणणे जाणून घेतले.
मात्र, या प्रश्नांकडे आतापर्यंत अपेक्षित लक्ष का गेले नाही आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच हा संवाद का सुरू झाला, असा सवाल काही पदवीधरांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे कराळे यांचा गडचिरोली दौरा हा केवळ पदवीधरांच्या प्रश्नांवर संवाद साधण्यासाठी होता की त्यामागे आगामी निवडणुकीची राजकीय पार्श्वभूमीही आहे, याची चर्चा रंगली आहे.
राजकीय संघर्षानंतर दिलजमाई?; वडेट्टीवार बॅकफूटवर, धानोरकरांसोबतचे वैर संपल्याची घोषणा
सोशल मीडियावर कराळे मास्तरांची लोकप्रियता आणि फॉलोअर्सची मोठी संख्या असली, तरी निवडणुकीतील प्रत्यक्ष राजकीय प्रभावाचे मोजमाप मतपेटीतूनच होते. त्यामुळे पदवीधर मतदारांमध्ये त्यांच्या दौऱ्याला कितपत प्रतिसाद मिळतो, त्यांच्या संवादाचा राजकीय परिणाम काय होतो आणि आगामी निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब उमटते का, याकडे आता लक्ष लागले आहे. कराळे मास्तरांचा हा अचानकचा ‘क्लास’ पदवीधरांच्या प्रश्नांना व्यासपीठ देणारा ठरतो की आगामी राजकीय समीकरणांचा भाग ठरतो, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.








