वडेट्टीवारांची तलवार म्यान, धानोरकरांच्या भूमिकेकडे लक्ष
Nagpur काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील राजकीय वैर आणि टोकाचे मतभेद अखेर संपले आहेत. चंद्रपूर महापालिकेतील सत्ता याच दोघांच्या भांडणामुळे काँग्रेसच्या हातातून निसटल्यानंतर, देर आये दुरुस्त आये या उक्तीप्रमाणे उशिरा का होईना विजय वडेट्टीवार यांना साक्षात्कार झाला आहे.
वडेट्टीवारांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात थेट खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नावाचा उल्लेख करत, आजपासून आमचे सगळे मतभेद आणि भांडणे संपली आहेत, अशी जाहीर घोषणा केली. यामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात मोठे आश्चर्य व्यक्त केले जात असून खासदार धानोरकर यावर काय प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील संघर्षाची ठिणगी लोकसभा निवडणुकीच्या तिकिटावरून पडली होती. वडेट्टीवार आपल्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी इच्छुक होते, तर दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी स्वतःहून उमेदवारी जाहीर करत थेट बंड पुकारले होते. पक्षाने धानोरकर यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या.
भाजपचा नागपूरसह पुण्यावरही दावा; शिवसेना-राष्ट्रवादी अस्वस्थ
त्यानंतर विधानसभा निवडणुकीत ब्रम्हपुरी मतदारसंघात धानोरकरांनी बाहेरचे लोक येऊन राज्य करत आहेत असा थेट हल्लाबोल वडेट्टीवारांवर केला होता. तरीही वडेट्टीवार जिंकले आणि काँग्रेसचे गटनेते झाले.
दोन्ही निवडणुका पार पडल्यानंतर हे शीतयुद्ध संपेल अशी अपेक्षा होती; मात्र चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीत हे भांडण विकोपाला गेले. काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येऊनही महापौरांच्या पदावरून दोन्ही नेत्यांचे गट आमनेसामने आले. धानोरकरांनी १५ नगरसेवक वेगळे केले, तर वडेट्टीवारांनीही दिल्लीत वजन वापरले. पक्षश्रेष्ठींनी महापौरपद धानोरकर गटाला आणि स्थायी समिती वडेट्टीवार गटाला देण्याचा तोडगा काढला. परंतु, अंतर्गत कटकारस्थानांमुळे काँग्रेसच्या हातातील सत्ता गेली आणि इतर पक्षांशी हातमिळवणी करत भाजपने आपला महापौर बसवला.
तुम्ही परस्पर आंदोलन केले तर चालते का? उद्धव ठाकरेंनी आता इगो बाजूला ठेवावा
महापालिकेतील दारुण पराभवानंतर आणि सध्या कोणतीही मोठी निवडणूक समोर नसताना वडेट्टीवारांनी अचानक ही तलवार म्यान केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काँग्रेसला मजबूत करण्यासाठी मतभेद बाजूला ठेवून काम करण्याचे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केले. मात्र, हे हृदयपरिवर्तन खरंच पक्षाच्या हितासाठी झाले आहे की यामागे काही नवा राजकीय डाव अथवा तडजोड आहे, याविषयी चंद्रपूर आणि विदर्भाच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत.








