मनपाच्या कारभारावर गंभीर सवाल, करदात्यांच्या पैशाचा अपव्यय असल्याचा आरोप
Nagpur नागपूरच्या ऐतिहासिक आणि पारंपारिक मारबत महोत्सवावर नागपूर महानगरपालिकेने केलेल्या तब्बल दोन कोटींहून अधिकच्या खर्चावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी मनपा प्रशासनाला धारेवर धरत या खर्चाचा सविस्तर हिशेब मागितला असून, नागपूरकरांच्या करदात्यांच्या पैशांचा हा सरळसरळ अपव्यय असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
नागपूरचा हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा अनेक वर्षांपासून नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून आणि जनसामान्यांच्या उत्साहाने साजरा केला जातो. यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासारख्या शासकीय संस्थांकडूनही निधी खर्च केला जातो. असे असताना, नागपूर महानगरपालिकेने या महोत्सवावर तब्बल दोन कोटी रुपयांहून अधिक उधळण्याची नेमकी आवश्यकता काय होती, असा थेट सवाल आमदार ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण महोत्सवात नागपूर महानगरपालिकेचे कोणतेही ठळक किंवा दर्शनी योगदान दिसून आले नाही. त्यामुळे ही मोठी रक्कम नेमकी कुठे, कशी आणि कोणत्या कामांवर खर्च करण्यात आली, याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
जनतेच्या घामाच्या पैशातून गोळा होणाऱ्या कररूपी निधीचा अशा प्रकारे मनमानी वापर करणे अत्यंत चुकीचे असून, या आर्थिक उधळपट्टीबाबत महापालिकेने उत्तरदायित्व स्वीकारले पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. विकास ठाकरे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या दोन कोटींच्या खर्चावरून आगामी काळात संघर्ष पेटण्याची दाट शक्यता आहे.








