मतदारसंघनिहाय नेमले निवडणूक प्रभारी, गडकरींनी घेतला मेळावा
Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत माजी आमदार अनिल सोले यांनी बंडखोरी केल्याने भारतीय जनता पक्षाने त्यांच्या विरोधात अत्यंत नियोजनबद्ध ‘टाईट फिल्डिंग’ लावली आहे. सोले यांना पक्षातल्या अंतर्गत व्यक्तींकडून कुठलीही मदत मिळणार नाही, याची पूर्ण दक्षता घेण्यासाठी पक्षाने दिग्गज नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
राज्याचे महसूलमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संपूर्ण निवडणुकीची धुरा स्वतः आपल्या खांद्यावर घेतली असून, मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांना निवडणूक प्रमुख करण्यात आले आहे. यात आता सह प्रभारी म्हणून आमदार संजय भेंडे आणि माजी आमदार संदीप जोशी यांची भर घालण्यात आली आहे. तसेच सुधीर दिवे आणि गिरीश देशमुख हे निवडणूक सह-प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
या निवडणुकीसाठी भाजपने पहिल्यांदाच अशी मोठी यंत्रणा उभी केली असून, आमदार संजय भेंडे आणि माजी आमदार संदीप जोशी यांच्यासह राज्यमंत्री पंकज भोयर आणि आमदार परिणय फुके यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय सर्व सहा जिल्ह्यांत मतदारसंघनिहाय निवडणूक प्रभारी नेमण्यात आले आहेत.
बांगरांच्या वाशिम वाऱ्या वाढल्या; राजकीय चर्चेला नवा ट्विस्ट!
दुसरीकडे, पक्षात बंडखोरीचे वारे वाहू लागल्याचेही दिसून येत आहे. माजी आमदार आणि स्वयंसेवक गिरीश व्यास यांनी अनिल सोले यांच्यासाठी आपले कार्यालय उघडून देत भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. तसेच भाजपचे कोषाध्यक्ष राजेश बागडी यांनीही सोले यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून अलिप्त असलेले संदीप जोशी यांना पक्षाने आता सह-प्रभारी करून सक्रिय केले आहे. या सर्व घडामोडींमुळे नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे, काँग्रेसचे अभिजित वंजारी आणि बंडखोर अनिल सोले यांच्यात अत्यंत चुरशीची तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दुष्काळाच्या बांधावर केंद्राचे पथक, मग शेतकऱ्यांचे ‘कैवारी’ लोकप्रतिनिधी कुठे?
विशेष म्हणजे उमेदवार जाहीर होण्यापूर्वी अनिल सोले यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला होता. यासाठी आमदार संजय भेंडे आणि माजी आमदार गिरीश व्यास यांनी पुढाकार घेतला होता. या कार्यक्रमाचा खर्च मध्य नागपूरच्या आमदाराने उचलला होता. हे बघता भाजपला अनेकांविषयी शंका येणे स्वाभाविक आहे. याकरिता एवढ्या मोठ्या प्रमाणात चोख बंदोबस्त केला जात असल्याचे भाजपच्या एका नेत्याने सांगितले.








