व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या संजय राठोड, इंद्रनील नाईक यांचा प्रभाव, अशोक उईके यांच्यासह भाजपसमोर आत्मपरीक्षणाचे आव्हान

संजय राठोड, इंद्रनील नाईक यांचा प्रभाव, अशोक उईके यांच्यासह भाजपसमोर आत्मपरीक्षणाचे आव्हान

जिल्हा बँक निवडणुक राष्ट्रवादी शतप्रतिशत शिंदेसेनेला सात जागा पण भाजपला पाच जागांवर धक्का

Yavatmal: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने सत्ता मिळवली असली, तरी या निकालाने मित्रपक्षांमधील राजकीय ताकदीचे वेगवेगळे चित्र समोर आणले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने लढविलेल्या सहाही जागांवर विजय मिळवून शंभर टक्के यश नोंदविले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सात जागांवर बाजी मारली, तर भाजपला आठपैकी केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे बँकेवरील सत्तेच्या लढाईबरोबरच महायुतीतील पक्षीय प्रभावाची चर्चाही सुरू झाली आहे.

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने सहाच्या सहा जागा जिंकल्या. एकही जागा गमवावी न लागल्याने पक्षाने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली. या निकालामुळे महायुतीतील राष्ट्रवादीचे राजकीय महत्त्व अधोरेखित झाले आहे. विशेषतः बँकेच्या आगामी अध्यक्षपदाच्या निवडीत पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या यशाकडे केवळ निवडणुकीतील विजय म्हणून नव्हे, तर सत्तावाटपातील प्रभावाच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.

पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिंदेसेनेने दहा जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मात्र, एका जागेवरील उमेदवारी न्यायालयीन निर्णयामुळे बाद झाल्याने प्रत्यक्ष लढतीचे गणित बदलले. उर्वरित नऊ जागांपैकी सात जागा जिंकत सेनेने आपले स्थान कायम ठेवले. लढविलेल्या दहा जागांच्या तुलनेत पक्षाचा विजयाचा दर ७० टक्के राहिला. महायुतीच्या एकूण यशात शिंदेसेनेच्या या कामगिरीचाही महत्त्वाचा वाटा आहे.

कालपर्यंत अडगळीत होते, आता पदवधीरच्या प्रचाराची जबाबदारी

राज्यात सत्तेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भाजपला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळविता आले नाही. आठ जागांवर उमेदवार उभे करूनही पक्षाला केवळ तीन जागा जिंकता आल्या. पाच जागांवरील पराभवामुळे भाजपचा विजयाचा दर ३७.५ टक्क्यांवर राहिला. मंत्री अशोक उईके आणि मदन येरावार यांच्यासह जिल्ह्यातील भाजप नेत्यांसाठी हा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. स्थानिक सहकार क्षेत्रातील मतदारांचा कल, उमेदवारांची निवड आणि पक्षाची संघटनात्मक ताकद यांचा आढावा घेण्याची गरज या निकालातून पुढे आली आहे.

माजी आमदारांच्या घरासमोर शिवीगाळ; दगड मारल्याचा आरोप

आमदार किसान वानखडे यांच्या मतदारसंघात दोनपैकी एका जागेवर विजय मिळाला, तर दुसऱ्या जागेचा निकाल ईश्वरचिठ्ठीने ठरला. त्यामुळे या ठिकाणी मतांच्या गणिताबरोबरच अनपेक्षित घटकांचाही परिणाम दिसून आला. एकूणच, जिल्हा बँकेच्या निवडणुकीने महायुतीची सत्ता कायम ठेवली असली, तरी मित्रपक्षांच्या कामगिरीत मोठी तफावत स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादीच्या शंभर टक्के यशामुळे तिचे महत्त्व वाढले, शिंदेसेनेने आपले स्थान टिकवले, तर भाजपसमोर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांचा फेरआढावा घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे. आगामी अध्यक्षपदाची निवड आणि सत्तेतील वाटाघाटींमध्ये या निकालाचे पडसाद कसे उमटतात, याकडे आता जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!