अनिल सोलेंच्या टीमसोबत आज चंद्रशेखर बावनकुळेंची स्पेशल बैठक
Nagpur नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये निर्माण झालेले मोठे अंतर्गत नाराजीनाट्य अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर संपुष्टात आले आहे. पक्षाच्या निर्णयाविरोधात बंडखोरीचा पवित्रा घेतलेले माजी आमदार अनिल सोले यांनी निवडणुकीतून माघार घेतली असून, आता त्यांच्या मायक्रो प्लॅनिंगचा पुरेपूर फायदा पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या विजयासाठी करून घेतला जाणार आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी लक्ष्मीनगरातील हॉटेल अशोक येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनिल सोले आणि त्यांच्या टीमसोबत एका विशेष बैठकीचे आयोजन केले आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने आधीच सुधाकर कोहळे यांना उमेदवारी जाहीर केली होती. पक्षाने कुठलेही सोपस्कार किंवा पूर्वकल्पना न देता अचानक घोषणा केल्यामुळे आणि मतदारसंघाच्या प्राथमिक तयारीपासून किंवा मतदार नोंदणीच्या कार्यक्रमांपासून आपल्याला पूर्णपणे डावलले जात असल्याची भावना अनिल सोले यांच्या मनात निर्माण झाली होती. यातच वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभाला मुख्यमंत्री नागपुरात असतानाही अनुपस्थित राहिल्याने आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधीच कोहळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने सोले कमालीचे नाराज झाले होते.
नाराजीतूनच त्यांनी मागे न हटता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केला. भाजपचे माजी आमदार गिरीश व्यास त्यांच्या मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी आपले कार्यालय सोले यांच्यासाठी खुले केले. एवढेच नव्हे तर, सोले यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यामुळे भाजपच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. पक्षाच्या अंतर्गत गोटातूनही त्यांना हळूहळू सहानुभूती आणि पाठिंबा मिळू लागला होता.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः यात लक्ष घातले. सोले यांना टाळणाऱ्या नेत्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री थेट सोले यांच्या घरी गेले. तिथे त्यांनी सोले यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतले आणि डावलल्या गेल्याच्या त्यांच्या भावना व मुद्द्यांचे गांभीर्य समजून घेतले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या व्यथा समजून घेतल्यानंतर अखेर सोले यांनी माघार घेत आपली तलवार म्यान केली.
कोहळे यांचे नाव परस्पर जाहीर करणारा तो नेता कोण?; मुख्यमंत्र्यांनी टोचले कान
अनिल सोले यांनी निवडणुकीसाठी केलेली मायक्रो प्लॅनिंग, त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि तळागाळातील कार्यकर्त्यांची मजबूत फळी आता भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी वापरली जाणार आहे. आज आयोजित केलेल्या बैठकीत याच मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार असून, बावनकुळे यांनी यापूर्वी घडलेल्या काही चुका मान्य करत सोले यांनी उपस्थित केलेले मुद्दे पूर्णपणे पक्षाच्या हिताचे असल्याचे स्पष्ट केले आहे. सोले यांच्या माघारीनंतर आणि त्यांच्या टीमची साथ मिळाल्यामुळे आता निवडणुकीतील विजय निश्चित असल्याचा दावा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियाशी बोलताना केला आहे.








