सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याची टीका
Nagpur दुष्काळ जाहीर करताना राज्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना ‘सरसकट मदत’ देण्याचे मोठे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, आता ऐन सणासुदीच्या काळात नियम आणि कायद्यांचे बोट दाखवून केवळ ५ हजार रुपयांची तोकडी मदत जाहीर केली आहे. ही राज्य सरकारची शेतकऱ्यांशी केलेली स्पष्ट लबाडी असून हा बळीराजाचा घोर अपमान आहे, असा संतापजनक आरोप राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.
निसर्गाच्या अवकृपेमुळे आणि दुष्काळामुळे आज राज्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल आणि उद्ध्वस्त झाला आहे. हातात आलेली पिके करपून गेल्यामुळे बळीराजासमोर उदरनिर्वाहाचा आणि कुटुंबाचा सांभाळ कसा करायचा, असा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्याला आधार देऊन त्याला संकटातून बाहेर काढण्याऐवजी, सरकार केवळ पाच हजारांची फुटकळ मदत देऊन त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप करत आहे.
अनिल देशमुख यांनी सरकारकडे आक्रमक मागणी करताना स्पष्ट केले की, केवळ नियमांची चक्रे फिरवून आणि कागदी घोडे नाचवून शेतकऱ्यांचे भले होणार नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सावरायचे असेल, तर प्रतिहेक्टरी १ लाख रुपयांची मदत आणि तीही किमान ३ हेक्टरच्या मर्यादेत तातडीने दिली पाहिजे, ही मागणी आम्ही सातत्याने करीत आहोत. यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्रसुद्धा पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवाळीच्या तोंडावर सरकारने जाहीर केलेली तुटपुंजी मदत ही शेतकऱ्यांची थट्टा करणारी आहे.
दुष्काळात शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे फोटो काढून वसुली; विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप
राज्य सरकारने आपल्या आश्वासनापासून मागे हटून शेतकऱ्यांचा जो अपमान केला आहे, तो महाराष्ट्र आणि या राज्यातील बळीराजा कदापि सहन करणार नाही. सरकारने तात्काळ आपल्या निर्णयाचा पुनर्वविचार करून घोषित मदत वाढवून दिली नाही, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही अनिल देशमुख यांनी यावेळी दिला.








