व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या ‘अर्थ’कारणावरून महायुतीत पुन्हा खटके, सुनेत्रा पवारांची सावध भूमिका

‘अर्थ’कारणावरून महायुतीत पुन्हा खटके, सुनेत्रा पवारांची सावध भूमिका

अर्थखात्याच्या मुद्यावरून तटकरेंवर विरोधक भिडले

Mumbai दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या अर्थखात्यावरून महायुतीत पुन्हा एकदा राजकीय घमासान सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीला परत देण्याची उघड मागणी केली आहे.

तर दुसरीकडे, विरोधक असलेल्या आमदार रोहित पवार यांनी हे खाते भाजपने चोरले असून ते कधीही परत मिळणार नाही, असा घणाघाती आरोप केला आहे. या सर्व वादानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट भूमिका घेत महायुतीत कोणीही लुडबूड करून भांडणे लावू नये, असे आवाहन केले आहे.

महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अर्थखाते अजित पवार यांच्याकडे होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर आणि अर्थसंकल्पाची वेळ जवळ आल्याने, तसेच सुनेत्रा पवार यांना या खात्याचा अनुभव नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे खाते तात्पुरत्या स्वरुपात स्वतःकडे ठेवले होते. योग्य वेळी हे खाते राष्ट्रवादीला परत देण्यात येईल, असे त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते.

मात्र, आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अर्थखात्यावरून नव्याने मागणी केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार यांनी तटकरे यांचे नाव न घेता, महायुतीचे सरकार व्यवस्थित चालले असून, कोणीही यात लुडबूड करून आमच्यात भांडणे लावू नये, अशा शब्दांत तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार नरेंद्र भोंडेकरांना लागली मंत्रिपदाची आस!

हेच टायमिंग साधत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उडी घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे खाते चोरले आहे, ते राष्ट्रवादीला कधीच मिळणार नाही, असा आरोप केला. रोहित पवारांच्या या टीकेला भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने प्रत्युत्तर दिले. आम्ही आमचे बघून घेऊ. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची काहीएक हरकत नाही, मग तुम्ही कशाला महायुतीत पडता असा सवाल करत महाजन यांनी रोहित पवारांना जोरदार टोला लगावला.

शेतकरी संकटात तर मुनगंटीवार सर्वांत पहिले मैदानात; समस्या सुटेपर्यंत पाठपुरावा

महायुतीचे नेते वरवर एकमेकांचा बचाव करताना दिसत असले, तरी या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसवर होत असलेल्या अन्यायाची जुनी जखम पुन्हा उघड झाली आहे. यापूर्वी पुणे विभागातील एका मतदारसंघाच्या उमेदवारीवरूनही सुनील तटकरे यांनी, आज दादा असते तर ही जागा गमावावी लागली नसती, असे वक्तव्य करून थेट सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्व आणि निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता अर्थखात्याच्या निमित्ताने पक्षात आणि महायुतीत पुन्हा एकदा कुरघोडीचे राजकारण तापल्याचे दिसत आहे.

error: Content is protected !!