व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या अभिजित वंजारींच्या पाठीत खंजीर; काँग्रेस नेत्याच्या कॉलेजमध्ये भाजपची बैठक

अभिजित वंजारींच्या पाठीत खंजीर; काँग्रेस नेत्याच्या कॉलेजमध्ये भाजपची बैठक

वंजारींच्या अडचणीत वाढ; काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Nagpur पदवीधर मतदारसंघाच्या मागील निवडणुकीत ऐतिहासिक विजयाची नोंद करणारे काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांच्यासमोर यंदाच्या निवडणुकीत तगड्या राजकीय आव्हानांचे डोंगर उभे ठाकले आहेत.

महाविकास आघाडीकडून पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वंजारी यांच्या अडचणीत सलग भर पडत असून, एकीकडे महायुतीची तगडी मोर्चेबांधणी आणि दुसरीकडे काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांची अंतर्गत नाराजी यामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
या निवडणुकीत भाजपने सुधाकर कोहळे यांना रिंगणात उतरवले असून, ही जागा कोणत्याही परिस्थितीत परत खेचून आणण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातले आहे.

२६ उमेदवार रिंगणात, दिवाळीपूर्वीच राजकीय फटाके फुटणार

फडणवीसांनी प्रचारासाठी येऊन भाजप पदाधिकाऱ्यांना निर्देश दिले, तसेच माजी आमदार अनिल सोले यांचीही समजूत काढत पक्षात समन्वय साधला. यादरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या ‘प्रियदर्शनी अभियांत्रिकी कॉलेज’मध्ये भाजप उमेदवार व पदाधिकाऱ्यांची एंट्री झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या बैठकीत भाजप नेत्यांची व संस्थेच्या संचालकांची चर्चा झाल्याचे समोर आले आहे. या बैठकीचे फोटोही व्हायरला झाले आहेत. यापूर्वी माजी मंत्री व उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत सुद्धा बरेच दिवस वंजारी यांच्यापासून अंतर ठेवून होते. त्यांची नाराजी अद्याप दूर झालेली नसतानाच, आता चतुर्वेदींचाही कल भाजपकडे झुकल्याचे दिसत असल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी वंजारी यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा रंगली होती. अगदी पक्षाच्या नेतृत्वानेही त्यांना थेट विचारणा केली होती. अखेरीस भाजपच्या काही नेत्यांचा कडाडून विरोध झाल्याने वंजारी यांनी काँग्रेसकडूनच लढणार असल्याचे स्पष्ट केले.

मात्र, आता थेट लढतीची वेळ आली असताना काँग्रेसच्याच नेत्यांची साथ त्यांना मिळताना दिसत नाही. वंजारी यांच्या प्रचारासाठी महाकाळकर सभागृहात आयोजित केलेल्या सभेकडे आमदार नितीन राऊत यांनी पाठ फिरवली, तर विजय वडेट्टीवार यांनी सभा संपताना सर्वात शेवटी हजेरी लावली. या सभेत अंतर्गत नाराजीचा मुद्दा तीव्रतेने समोर आला. मागील सहा वर्षांत उत्तर नागपूरच्या एकाही कार्यकर्त्याला किंवा शैक्षणिक संस्थेला वंजारी यांनी मदत केली नसल्याचा संताप अनेकांनी बोलून दाखवला.

बुलढाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फोडला भोपळा

प्रफुल पटेल महायुतीत गेल्याने गोंदियातूनही मोठा धक्का
मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीत होती, तेव्हा गोंदिया जिल्ह्याचे नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांची वंजारी यांना मोठी मदत लाभली होती. पटेल यांच्या शैक्षणिक संस्थेमार्फत सुमारे चार हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मात्र, आता प्रफुल पटेल महायुतीत असल्यामुळे ती रसद आणि ताकद वंजारी यांच्याकडून पूर्णपणे सुटली आहे.

error: Content is protected !!