व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना 5 हजारांची मनीऑर्डर!

शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना 5 हजारांची मनीऑर्डर!

 

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.वाघमारे यांनी नोंदविला उपरोधिक निषेध

 

Yavatmal: अतिवृष्टी, नापिकी आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत असताना, त्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरपरिषदेतील गटनेते डॉ. नीरज वाघमारे यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच हजार रुपयांची मनीऑर्डर पाठवून शेतकऱ्यांच्या परिस्थितीवरून सरकारला उपरोधिक टोला लगावला.

यवतमाळ येथील मुख्य टपाल कार्यालयातून नागपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या पत्त्यावर ही मनीऑर्डर पाठविण्यात आली. या रकमेवर २५० रुपये कमिशन अदा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा मुद्दा अधोरेखित करत डॉ. वाघमारे यांनी या कृतीतून शासनाच्या धोरणांविषयी आपली नाराजी व्यक्त केली. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, नापिकीमुळे घटलेले उत्पन्न आणि डोक्यावर असलेले कर्ज यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी कुटुंबांना सण साजरा करणेही कठीण होत असल्याचा मुद्दा डॉ. वाघमारे यांनी उपस्थित केला.

अभिजित वंजारींच्या पाठीत खंजीर; काँग्रेस नेत्याच्या कॉलेजमध्ये भाजपची बैठक

 

“शेतकऱ्यांच्या घरात दिवाळीचा दिवा पेटण्याची शाश्वती नाही. मुख्यमंत्र्यांच्या दिवाळीत पैशांची कमतरता पडू नये, म्हणून ही रक्कम पाठविली,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या कृतीमागील भूमिका स्पष्ट केली. मनीऑर्डरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांकडे लक्ष वेधण्याचा आणि शासनापर्यंत त्यांच्या व्यथा पोहोचविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ आश्वासने न देता शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही डॉ. वाघमारे यांनी केली. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतजमिनी आणि पिकांचे पंचनामे वेळेत पूर्ण करणे, पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे तसेच कर्जमुक्तीबाबत स्पष्ट निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी, अशी त्यांची भूमिका आहे. मनीऑर्डर पाठविण्याच्या या उपरोधिक कृतीमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकीय वर्तुळात लक्ष वेधले गेले आहे. आता शासन या मागण्यांबाबत कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

____

dr-neeraj-waghmare
yavatmal-farmer-issues-money-order-cm-devendra-fadnavis-

error: Content is protected !!