नगराध्यक्ष तेजश्री जैन यांचा नेत्यावर पलटवार
Umarkhed: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी आवश्यक असलेल्या ना हरकत प्रमाणपत्रावरून उमरखेडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्द्यावरून भाजपचे नेते नितीन भुतडा यांनी केलेल्या वक्तव्याला नगराध्यक्ष तेजश्री जैन यांनी प्रत्युत्तर दिले. आपल्या संविधानिक पदाचा अवमान करणे म्हणजे संपूर्ण महिला वर्गाचा अवमान असल्याची भूमिका मांडत त्यांनी संबंधित नेत्याच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, पुतळ्याच्या कामासाठी प्रमाणपत्र देण्यास जाणीवपूर्वक विलंब केल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात शिवप्रेमींनी आंदोलन केले होते. या वेळी भाजपचे नितीन भुतडा यांनी नगराध्यक्ष ना हरकत प्रमाणपत्र देत नसल्याचा आरोप केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला. त्यानंतर या प्रकरणावरून स्थानिक राजकारणात आरोप – प्रत्यारोपांना सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर जनशक्ती पॅनलच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष तेजश्री जैन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानासाठी काँग्रेसची जिल्हाभर पदयात्रा
नवरात्रोत्सवात स्त्रीशक्तीचा सन्मान केल्यानंतर लगेचच आपल्याबद्दल अपशब्द वापरणे योग्य नसल्याचे तेजश्री जैन म्हणाल्या. एखाद्या लोकप्रतिनिधीच्या संविधानिक पदाचा उल्लेख करून अवमानकारक वक्तव्य करणे हे केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून संपूर्ण महिला वर्गाच्या सन्मानाशी संबंधित आहे, असे त्यांनी नमूद केले. संबंधित नेत्याच्या वक्तव्यावर त्यांचा पक्ष कोणती भूमिका घेतो, याकडेही लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाबाबत जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत जैन यांनी महाराजांविषयी आपल्याला नितांत आदर असल्याचे स्पष्ट केले. आचारसंहिता संपल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र देऊन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कामाला गती देण्यात येईल आणि १९ फेब्रुवारीपूर्वी पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
जनशक्ती पॅनलचे नेते ॲड. संतोष जैन यांनी या प्रकरणातील प्रशासकीय प्रक्रियेची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ७ सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने नगरपरिषदेकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी पत्र पाठविले होते. मुख्याधिकाऱ्यांनी ११ सप्टेंबर रोजी हे प्रकरण बांधकाम विभागाकडे वर्ग केले. त्यानंतर २१ सप्टेंबरला नोटीस देण्यात आली आणि २८ सप्टेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्यान विकसित करण्यासह एकूण ५५ विकासकामांच्या प्रस्तावांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, २० सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरदरम्यान शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागू झाल्याने सभा रद्द करावी लागल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला नगरपरिषदेचे उपाध्यक्ष जुबेर कुरेशी, गोपाल अग्रवाल, बाळासाहेब नाईक, रसूल पटेल, गजानन रासकर, गजेंद्र ठाकरे, वीरेंद्र खंदारे, राहुल काळबांडे, वासिफ पठाण, अब्दुल गणी शहा, कैलास इंगोले यांच्यासह जनशक्ती पॅनलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








