१४ टेबलवर होणार मतमोजणी; १७५ अधिकारी-कर्मचारी नियुक्त
Amravati अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मतमोजणीसाठी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली असून, पहिल्या पसंतीच्या मतांचा कौल दुपारपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सायंकाळपर्यंत निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होऊ शकतो.
या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील ८१ मतदान केंद्रांवर मतदान झाले. एकूण ३५ हजार ८१० मतदारांपैकी ९२.२५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीसाठी ३३ हजार ३४ मतपत्रिका असून, ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी १७५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात
अमरावती येथील लोकशाही भवनात मंगळवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सर्व मतपत्रिका एकत्र करून त्यांची सरमिसळ केली जाईल. त्यानंतर मतपत्रिकांचे २५-२५ च्या गठ्ठ्यांमध्ये वर्गीकरण करण्यात येईल. अवैध मतपत्रिका वेगळ्या काढल्यानंतर वैध मतपत्रिकांच्या आधारे विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा निश्चित केला जाईल.
तीन फेऱ्यांमध्ये पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी
मतमोजणीसाठी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर मतपत्रिकांचे गठ्ठे ठेवून पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाईल. एकूण ३३ हजार ३४ मतपत्रिकांची मोजणी करण्यासाठी तीन फेऱ्या होण्याची शक्यता आहे. पहिल्या पसंतीच्या मतांची आकडेवारी दुपारपर्यंत स्पष्ट होऊ शकते. मात्र, विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण न झाल्यास पुढील पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागू शकते. त्यामुळे अंतिम निकाल जाहीर होण्यास सायंकाळपर्यंत वेळ लागण्याची शक्यता आहे.








