शेतकरी, आदिवासींचे प्रश्न सोडविण्याची काँग्रेसची मागणी
Gadchiroli : जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी आणि सर्वसामान्य नागरिकांचे अनेक मूलभूत प्रश्न अद्याप प्रलंबित असताना राज्य सरकार जनजातीय गौरव दिनाच्या आयोजनावर कोट्यवधी रुपये खर्च करीत असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीने केला आहे. उत्सव साजरे करण्यापेक्षा जनतेच्या ज्वलंत प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांची सोडवणूक करावी, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली. १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर १३ नोव्हेंबरला आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसने सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.
पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष पंकज गुडेवार, माधुरी मडावी, असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर, नगरसेवक पराग पोरेड्डीवार, नेताजी गावतुरे, अब्दुल पंजवानी, रुपेश टिकले आणि रजनीकांत मोटघरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना पंकज गुडेवार यांनी शेतकऱ्यांच्या जमिनींच्या प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. गुरवळा येथे शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी २ ऑक्टोबरपासून साखळी उपोषण सुरू आहे. तसेच आष्टी येथे या प्रश्नावर तीन वेळा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र, वारंवार आंदोलने करूनही सरकारकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून केवळ उत्सव आणि जाहिरातबाजीवर भर दिला जात असल्याची टीका त्यांनी केली.
पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा राजकीय दावा; परिसीमन विधेयकासाठी शरद पवारांच्या ८ खासदारांवर सरकारचा डोळा
आदिवासी समाजाच्या नामकरणावरूनही काँग्रेसने सरकारला लक्ष्य केले. आदिवासी हे देशाचे मूळ निवासी असून त्यांची स्वतंत्र सांस्कृतिक परंपरा, इतिहास आणि ओळख आहे. अशा समाजाचा उल्लेख ‘जनजातीय’ असा करून त्यांची मूळ ओळख दुय्यम ठरविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप माधुरी मडावी यांनी केला. आदिवासींच्या अस्मितेशी संबंधित या विषयावर काँग्रेस ठामपणे आवाज उठवत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील शेतीविषयक संकटाकडे लक्ष वेधताना मडावी यांनी केवळ दोन तालुके दुष्काळग्रस्त घोषित करून चालणार नसल्याचे सांगितले. उर्वरित दहा तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून बाधित शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी. तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. सिरोंचा-अलापल्ली राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले कामही तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास १५ नोव्हेंबर रोजी जनजातीय गौरव दिनाच्या कार्यक्रमादरम्यान काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविण्यात येईल, असा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे आगामी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
___








