व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण राष्ट्रवादीचे विलिनीकरण ठरले होते, दादा गेले आणि विषय संपला

राष्ट्रवादीचे विलिनीकरण ठरले होते, दादा गेले आणि विषय संपला

सुप्रिया सुळे यांचा एकत्रीकरणावर मोठा दावा, चर्चेवर फूलस्टॉप लागल्याचे कारण सांगितले

Mumbai गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणावरून सुरू असलेल्या चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांनी अखेर पूर्णविराम दिला आहे.

अजित दादा हयात असताना दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा झाली होती आणि त्याची तारीखही ठरली होती. मात्र, दादा गेल्यानंतर हा विषय आम्ही बंद केला आहे. आता हा विषय आमच्यासाठी संपला असून सध्या सुरू असलेल्या सर्व चर्चा केवळ अफवा आहेत, असा मोठा दावा सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना केला.

शरद पवार आजारी असताना प्रफुल पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलिनीकरण होणार होते, असे जाहीरपणे सांगितले होते. तसेच मंत्री छगन भुजबळ यांनीही याला दुजोरा देत हा खेळ दोन्हीकडून खेळायला हवा असे सूचक वक्तव्य केले होते.

जनजातीय गौरव दिनाच्या तयारीत भाजप पदाधिकाऱ्यांची गर्दी

दुसरीकडे, शरद पवार यांनी आपल्या नेत्यांची बैठक घेतली होती आणि खासदार पार्थ पवार यांनीही त्यांची भेट घेतली होती. याशिवाय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही काही गोष्टी तुम्हाला कळतीलच असे सूचक विधान केल्याने विलिनीकरणाच्या चर्चांना मोठे उधाण आले होते. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या पत्रकार परिषदेत याबाबत मोठी घोषणा होईल, असा अंदाज वर्तवला जात होता.

मात्र, प्रत्यक्षात सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाचे सर्व दावे फेटाळून लावले. आमच्या बैठका या केवळ लोकांच्या कामांसाठी होतात आणि राजकारणात एकत्र येत काम करावेच लागते. राजकीय पक्ष असल्यामुळे नेत्यांच्या भेटीगाठी होत असतात, असे स्पष्ट करत सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाचा अध्याय पूर्णपणे बंद झाल्याचे जाहीर केले. विलिनीकरणाबाबत आमदार, खासदारांना मेसेज पाठवण्यात आले, बैठकीला बोलवण्यात आले हेसुद्धा खोटे आहे. पक्षाच्यावतीने कोणालाच मेसेज पाठवण्यात आले नाही, मलाही कोणाचा मेसेज आला नसल्याचे खासदार सुळे यांनी स्पष्ट केले.

 

error: Content is protected !!