Water supply to 19 villages in Sangrampur and Jalgaon Jamod stopped : थकीत पाणीपट्टीमुळे जीवन प्राधिकरणाचा कठोर निर्णय
Khamgao महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाणीपट्टी थकबाकी वसूल करण्यासाठी दिलेल्या अंतिम मुदतीनंतर कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. बुधवारी (५ फेब्रुवारी) सकाळपासून संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील १९ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. उर्वरित थकबाकीदार गावांवरही टप्प्याटप्प्याने ही कारवाई केली जाणार आहे.
“धरण उशाला आणि तरीही घसा कोरडा” अशी परिस्थिती टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनी लवकरात लवकर थकबाकी भरावी, अन्यथा पाणीटंचाईची समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
वरी भैरवगड येथील हनुमान सागर धरणातून १४० गावांना भूमिगत जलवाहिनीद्वारे शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. मात्र, ११८ ग्रामपंचायतींनी तब्बल १७ कोटी १७ लाख ८६ हजार ७३८ रुपये पाणीपट्टी थकवली आहे. केवळ चार गावांनी काही प्रमाणात ही रक्कम भरली असून, उर्वरित गावांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
पाणीपट्टी भरलेल्या ४ गावांचा पुरवठा सुरळीत
पातुर्डा खुर्द, कवठळ, कुंभारखेड, हिंगणा या गावांनी काही प्रमाणात थकीत रक्कम भरल्यामुळे त्यांचा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. उपविभागीय अधिकारी इंदल राठोड यांनी स्पष्ट केले की, “११४ गावांवर कोट्यवधींची थकबाकी असून, पहिल्या टप्प्यात १९ गावांचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. उर्वरित गावांचाही पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने खंडित केला जाईल.”
कुणावर किती थकबाकी?
संग्रामपूर तालुका (९ गावे) – ५ कोटी ३ लाख ५० हजार ३३६ रुपये
गावे : वरवट बकाल, पातुर्डा बु., सोनाळा, संग्रामपूर शहर, पळशी, टूनकी, वानखेड, एकलारा, रुधाना.
जळगाव जामोद तालुका (१० गावे) – १ कोटी ६७ लाख ५० हजार ८५० रुपये
गावे : धानोरा, पळशी सुपो, खांडवी, अकोला खुर्द, काजेगाव, रसुलपूर, खेर्डा खुर्द, वडशिंगी, निंभोरा बु., बोराडा बु.