The need of research for the welfare of farmers : राज्यपालांचे आवाहन; डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारंभ
Akola कृषी पदवीधरांनी शिक्षण, तंत्रज्ञान आणि संशोधनाचा उपयोग शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच शेती क्षेत्राच्या प्रगतीसाठी करावा, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रतिकुलपती तथा राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, कर्नाटक कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष अशोक दलवाई, कुलगुरू डॉ. शरद गडाख, आमदार अमोल मिटकरी, आमदार हरिश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. समारंभात विविध विद्याशाखांतील एकूण ४,०४० स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली.
Mahayuti Government: पीडब्ल्यूडी कंत्राटदारांचे राज्यभर काम बंद!
राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, “ज्ञान मिळवणे ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. देशाच्या कृषी क्षेत्राला अधिक प्रगत करण्याची जबाबदारी नवपदवीधरांवर आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बीजनिर्मिती, पशुधन विकास, आदर्श ग्राम प्रकल्प अशा विविध उपक्रमांबरोबरच नवनव्या अभ्यासक्रमांतून विद्याशाखांचा विकास केला आहे.”
ते पुढे म्हणाले, “ज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताची झेप जागतिक स्तरावर लक्षणीय ठरली आहे. औद्योगिक क्षेत्राबरोबरच कृषी क्षेत्रातही महाराष्ट्राने उल्लेखनीय प्रगती केली आहे. विद्यार्थ्यांनी ठोस ध्येय निश्चित करून त्यानुसार वाटचाल करावी.”
कृषी मंत्री कोकाटे म्हणाले, “जगभरातील विविध क्षेत्रांत मोठे बदल घडत आहेत. त्यानुसार कृषी क्षेत्रातही बदल करणे आवश्यक आहे. शेतीचा उत्पादनखर्च कमी करून उत्पन्नवाढीसाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. यासाठी शासन आवश्यक पावले उचलत आहे. ‘एआय’सारख्या नवतंत्रज्ञानाचा उपयोग शेतीसाठी व्हावा, यासाठीही शासन प्रयत्नशील आहे.”
दलवाई म्हणाले, “शाश्वत विकासासाठी कृषी उत्पादन प्रणालीत पुनर्रचना आवश्यक आहे. कृषी पर्यावरणशास्त्र आणि सेंद्रिय शेती यांची सांगड घालणे महत्त्वाचे आहे. जैवविविधतेचे संरक्षण, विषमुक्त व सुरक्षित अन्ननिर्मिती, मृद व जलसंवर्धन हे आवश्यक आहे. त्यामुळे कृषी संशोधनाचा मुख्य उद्देश पर्यावरणपूरक असावा.”
कुलगुरू डॉ. गडाख यांनी प्रास्ताविकात विद्यापीठातील विविध उपक्रमांची माहिती दिली. या समारंभात २५ विद्यार्थ्यांना कृषी, उद्यानविद्या आणि कृषी अभियांत्रिकी या विषयांमध्ये पीएच.डी. प्रदान करण्यात आली.