More congress people joining Shinde group : माजी आमदारांसह आणखीही काहींची तयारी
Gondia विधानसभा निवडणुकीत काही पक्षांनी जुने चेहरे डावलून नवीन चेहऱ्यांना संधी दिली. त्यामुळे नाराज झालेल्यांनी निवडणूक होईपर्यंत शांत राहण्याची भूमिका घेतली. मात्र, आता आपल्या राजकीय भविष्याची चिंता करीत वेगळी वाट शोधली आहे. जिल्ह्यातील दोन माजी आमदार आणि दोन माजी आमदारांचे पुत्र २० फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत.
माजी आमदारांसह आणखी पदाधिकारीसुद्धा यावेळी शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पक्ष प्रवेश सोहळ्याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात काँग्रेस पक्षात बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या आहे. यानंतर काही नाराज नेत्यांनी निवडणुकीपर्यंत शांत भूमिका घेत निवडणुकीनंतर निर्णय घेऊ, असे सांगितले होते.
त्यामुळे हे नाराज नेते नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्हावासियांच्या नजरा लागल्या होत्या. गेले दोन महिने शांत असलेल्या या नाराज नेते आता आपल्या पुढील राजकीय भविष्याचे गणित जुळवू लागले आहे. यासाठी आता त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २० फेब्रुवारी रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
देवरी येथे शिंदेसेनेतर्फे मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात पक्ष प्रवेश होणार आहे. यावेळी दोन माजी आमदार, दोन माजी आमदारांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एक जेष्ठ नेता सुद्धा शिंदेसेनेचे धनुष्यबाण हाती घेणार आहेत. तर, हा पक्ष प्रवेश सोहळा अविस्मरणीय व्हावा, यासाठी आणखी काही जणांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
त्यामुळे २० फेब्रुवारी शिंदेसेनेच्या गळाला नेमके कोण-कोण लागतात आणि कोणत्या पक्षाला याचे हादरे बसतात, याची सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. नाराजांची फौज केवळ काँग्रेसमध्येच नाही, तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातसुद्धा आहे. त्यामुळे यातील सर्व नाराज नेते आणि पदाधिकाऱ्यांना एकत्रीत एका मंचाखाली आणण्याचा प्रयत्न एक माजी आमदार करीत आहेत. तर एक बडा नेता पडद्या मागे राहून सर्व सूत्रे हलवित असल्याची माहिती आहे.
भंडारा-गोंदिया विधान परिषदेची जागा रिक्त आहे. त्यामुळे ही जागा आपल्याला मिळावी, यासाठी सुद्धा काही जणांनी शिंदेसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. तर, काहींना त्यांचे राजकीय अस्तित्व कायम ठेवण्यासाठी धडपड सुरू केल्याची माहिती आहे.