Breaking

Marathi-Sahitya-Sammelan-Delhi : तोपर्यंत साहित्य संमेलने सरकारच्या गोठ्यात बांधावीच लागतील!

Dr. Shripad Joshi says, The president of Sahitya Sammelan was changed due to political reasons : साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षांचे परखड मत; राजकीय कारणांनी अध्यक्ष बदलले

Nagpur साहित्य महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आम्ही नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केला. लोकांकडून पैसा गोळा करण्याचा उपक्रम राबविला. यात फारसे यश कधीच आले नाही. परंतु राज्यातील प्रत्येकाने एक रुपया दिला तरी १२ कोटी रुपये जमा होतात. यावर जोपर्यंत विचार होणार नाही, तोपर्यंत साहित्य संमेलने सरकारच्या गोठ्यात नेऊन बांधावीच लागणार आहेत, अशी उद्वेगजनक टिप्पणी ज्येष्ठ विचारवंत व अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी Dr. Shripad Bhalchandra Joshi यांनी ‘सत्तावेध’शी Sattavedh बोलताना केली.

Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan Delhi ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन येत्या २१ फेब्रुवारीपासून राजधानी दिल्लीत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ‘राजसत्ता व धनसत्तेच्या आहारी संमेलने गेली की असेच होत असते. वर्धेच्या संमेलनापासून तर हे अधिकच ठळकपणे दिसू लागले आहे. मराठी साहित्यासाठी हे विष प्रयोग ठरत आहेत. याची नोंद कधी ना कधी साहित्यप्रेमींना घेण्याची गरज आहे. हा दौलतजादा मराठी साहित्याला परवडणारा नाही.’

Indurikar Maharaj : सैन्यात शेतकऱ्यांची मुलं, ही शिवरायांची किमया !

खरं तर साहित्य संस्था व साहित्यिकांच्या स्वायत्तेवर हे छुपे आक्रमण आहे. ही आक्रमणं सत्व आणि स्वत्व नेस्तनाबूत करणारी आहेत. पैसा पुरविणारा आपले घोडे दामटणार हे, स्पष्ट आहे. आता पैसा महत्त्वाचा की विचार हे आधी ठरवावे लागेल. इतर भाषांमध्ये अशी संमेलने होत नाहीत. परंतु त्यांचा भाषांचा, साहित्याचा दर्जा बघा. तामीळ, बांगला, मल्याळी, कन्नड, ओडीसा या भाषांचे वैभव दिवसेंदिवस वाढत आहे. आणि इकडे मराठीला घरघर कां लागली आहे याचा आपण विचार करीत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

दिल्लीतील संमेलन सरकारी?
दिल्लीत मराठी साहित्य संमेलन आहे की सरकारी विश्व मराठी संमेलन हेच कळत नाही. अळणी, सपक, विरोधी मतांना आणि ते व्यक्त करणाऱ्यांना खड्यासारखे बाजुला सारून असणारे विषय, वक्ते यांची यादी बघितल्यावर असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. येण्याजाण्याचा खर्च मिळतो, राहण्याची उत्तम सोय होते व काहीशी बक्षिसी मिळते. साहित्यिक खूष होतात.

Fair Price Shops : स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी !

 

विरोधी मत असणाऱ्यांना निमंत्रण का नाही?
प्रस्थापितांविरोधात मत असलेल्यांना साहित्य संमेलनात बोलावले जाणार नाही. याची काळजी घेण्याचे कारण काय? यातून मराठी साहित्य जागतिक पातळीवर कसे काय जाणार आहे? संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या भरवशावर किती दिवस आपली टिमकी वाजवणार. नव्या दमदार, आश्वासक, परिवर्तक,साहित्याची निर्मिती का थांबली आहे? याचे उत्तर आपला वैचारिक बोन्साय होण्याच्या या प्रक्रियेत आहे, असंही स्पष्ट मत त्यांनी मांडलं.

Marathi-Sahitya-Sammelan-Delhi : साहित्य व्यवहार लाळघोट्यांच्या हाती जाण्याचा धोका

राजकीय कारणांनी अध्यक्ष बदलले
गेल्या काही वर्षांपासून तर सत्ताकेंद्रे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कोण असू नये, हे सांगायला लागली आहेत. वर्धा येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ लेखक व पत्रकार सुरेश द्वादशीवार यांचे नाव निश्चित झाले होते. परंतु सरकारने पैसा देणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अध्यक्ष बदलण्यात आल्याचे कळते. यवतमाळमध्ये तेच झाले. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटनासाठी बोलविण्याचा निर्णय झाला. परंतु निमंत्रण देणाऱ्या आयोजकांनीच ते राजकीय कारणांसाठी निमंत्रण परत घेतले, याचा डॉ. जोशी यांनी आवर्जून उल्लेख केला.

  • सुरेश भुसारी, संपादक

    संपादक, सत्तावेध

    गेल्या ३० वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. 'लोकसत्ता', लोकमत' व 'सकाळ'सारख्या माध्यम समूहांमध्ये वार्ताहर ते दिल्लीतील विशेष प्रतिनिधी म्हणून वार्तांकन केले आहे. महापालिका, जिल्हा परिषदेसह विधानसभा व संसदेतील वार्तांकनाचा त्यांना अनुभव आहे. राजकीय घडामोडींसह विविध विषयांवर त्यांनी विपूल लेखन केले आहे. नागपुरातील ऐतिहासिक घटनांवर आधारित 'हरवलेलं नागपूर' या त्यांच्या पुस्तकाला विदर्भ साहित्य संघाचा उत्कृष्ट ग्रंथलेखनाचा पुरस्कार मिळाला आहे.