Central government will try to build Maharashtra Sadan in Dubai : केंद्रीय मंत्र्यांनी दिला शब्द; अबुधाबीत साजरी झाली शिवजयंती
Buldhana आखाती देशात स्थायिक झालेल्या मराठी लोकांना एकत्र येता यावे. त्यांना सामाजिक उपक्रम साजरे करता यावे. यासाठी दुबईत महाराष्ट्र सदन बांधण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र स्तरातून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी अबुधाबी येथे दिली. प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत दुबईतील अबुधाबी येथे शिवजयंती उत्सव साजरा झाला. महाराष्ट्र सदनाची घोषणा ऐकताच उपस्थितांनी ‘जय भवानी जय शिवराय’ असा जयघोष करून आनंद व्यक्त केला.
आखाती देशांमध्ये स्थायिक झालेल्या नवीन मराठी पिढीला इतिहासाची ओळख व्हावी. या दृष्टिकोनातून दुबईतील अबुधाबी येथे इन्स्पायर इव्हेंट अँड प्रमोशन व भारतीय स्थानिक रहिवाशांच्या वतीने शिवजयंती साजरी झाली. बीएपीएस हिंदू मंदिर अबुधाबी येथे शिवजयंती उत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतापराव जाधव होते. तर अतिथी म्हणून मालोजी राजे शाहू छत्रपती, खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते.
Justice Bhushan Gawai : Court Case करण्यापेक्षा तडजोडीवर भर द्या!
मंत्री जाधव म्हणाले, ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास प्रेरणादायी आणि समाजाला स्फूर्तीदायक आहे. महाराजांचा इतिहास गौरवशाली आहे. महाराजांनी आपल्या राजवटीमध्ये लोकांच्या हिताची कामे केलीत. अशा स्वरूपाची कामे भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू आहेत. सातासमुद्रापारही छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा केला जातो. ही मराठी माणसासाठी आणि आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.’
या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा येणार होते. त्यांच्या शुभेच्छा घेऊन मी तुमच्यापर्यंत आलो आहे, असंही प्रतापराव जाधव यांनी सांगीतलं. अबुधाबी येथील मराठी माणसांसोबत त्यांनी संवाद साधला. या कार्यक्रमाला अबुधाबी येथील मराठी कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.