Breaking

Siddharth Kharat : पाणीपुरवठा याेजनेवरून राजकारण तापणार!

Irregularities in Jaljeevan Yojana works : जलजीवन योजनेच्या कामाचा बोजवारा; आमदारांनी केली चौकशीची मागणी

Buldhana मेहकर व लोणार या दोन तालुक्यांतील अनुक्रमे ९२ व ६५ गावांमध्ये जलजीवन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली जात आहे. मात्र, या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडे तोंडी तसेच लेखी स्वरूपात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या कामांबाबत जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे.

जलजीवन योजनेची कामे अपूर्ण राहिल्याने अथवा निकृष्ट दर्जाची झाल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, या दोन्ही तालुक्यांतील जलजीवन योजनेच्या चालू व अर्धवट अवस्थेतील कामांची चौकशी त्रयस्त यंत्रणेमार्फत करण्याची मागणी आमदार सिद्धार्थ खरात यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे. त्यांनी सोमवारी यासंदर्भात अधिकृत निवेदन सादर केले.

आमदार सिद्धार्थ खरात यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बुलडाणा जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत मेहकर व लोणार तालुक्यातील जलजीवन योजनेच्या कामांची अत्यंत वाईट स्थिती आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा मूळ स्त्रोत अस्तित्वात नसताना अथवा तो शाश्वत नसताना पाईपलाइन टाकण्यात आली आहे.

काही गावांमध्ये अर्धवट कामांची बिले मंजूर करून कामे अपूर्ण ठेवण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी पाणी टाक्या व आवश्यक विद्युत जोडण्या न दिल्याने संपूर्ण व्यवस्था ठप्प झाली आहे. याशिवाय, गावातील अंतर्गत सुस्थितीतील रस्ते खोदून पाइपलाइन बसवण्यात आल्या आहेत, मात्र रस्त्यांचे पुनरुत्थान न केल्याने त्या भागातील वाहतूक आणि रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

तसेच, काही ठिकाणी पाइपलाइन टाकून दोन वर्षे उलटली असल्याने त्या पाइपांचे नुकसान झाले आहे. बसवलेले नळ गळती देत आहेत आणि काही ठिकाणी त्यांची चोरीही झाल्याचे आढळून आले आहे. बहुतांश ठिकाणी जलजीवन योजनेची कामे निकृष्ट दर्जाची झाली असून, त्यामुळे शासनाच्या निधीचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय झाल्याचे दिसून येत आहे.

यामुळे, या संपूर्ण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. यामुळे, त्वरित त्रयस्त यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली आहे. मेहकर मतदारसंघातील वडाळी हे शेवटच्या टोकावरील गाव आहे. येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे काम मागील दोन-तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः महिलांना अर्धा किलोमीटरचा चढ चढून हाताने पाणी वाहून न्यावे लागते. फेब्रुवारी महिन्यात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता असल्याने या गावातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, असे निर्देश आमदार सिद्धार्थ खरात यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.