Case registered against officer who damaged pond’s edge : अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; सात लाखांचा भुर्दंड बसला
Gondia उपद्रवी आणि असंवेदनशील अधिकाऱ्यांची आपल्याकडे कमतरता नाही, हे सिद्ध करणाऱ्या घटना वारंवार घडत असतात. विशेषतः शेतकऱ्यांच्या कल्याणाची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर असते त्यांना जबाबदारी कळली नाही की मोठे नुकसान होत असते. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये घडलेल्या एका प्रकरणात अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर चर्चा सुरू झाली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता तलावाची पाळ फोडून शासन तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करणे प्रभारी जलसंधारण अधिकाऱ्याला चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणात त्याच्यावर नवेगावबांध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मायकल टोपराव पुंडकर (४८, प्रभारी जलसंधारण अधिकारी, उपविभाग, अर्जुनी-मोरगाव) असे आरोपी अभियंत्याचे नाव आहे.
मायकल पुंडकर याने २८ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता मामा तलावाच्या सांडव्याचे बांधकाम करण्याकरिता कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता मामा तलावाची पाळू फोडली होती. यात शेतकऱ्यांचे दोन लाख २२ हजार ७५० रुपयांचे पीक वाहून गेले होते. तसेच मामा तलावाच्या पाळीचे चार लाख ८४ हजार ६९७ रुपये, असे एकूण सात लाख सात हजार ४४७ रुपयांचे नुकसान केले होते.
Vidarbha Farmers : शेतकऱ्यांना ना रेशन मिळाले, ना आर्थिक मदत!
पाटबंधारे अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान निवारण अधिनियमाचे उल्लंघन केल्यामुळे आरोपी मायकल पुंडकर याच्याविरुद्ध गुरुवारी (दि. ६) नवेगावबांध पोलिसात उपविभागीय जलसंधारण अधिकारी यशवंत गणपत बरडे (५३) यांनी तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३२४ (५), १९८, १९९ सहकलम ९३, (१) (ए), (सी), ९३, (२), (३), (४), (५), ९४ (१), ९५, पाटबंधारे अधिनियम १९७६, सहकलम १५, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, सहकलम ३ (१), सार्वजनिक संपत्तीचे नुकसान निवारण अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अनमोल भोसले करीत आहेत.








