Strong start, will be reflected in the first budget : महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढणार, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विश्वास
Mumbai : राज्यातील सर्वसामान्य माणसाचे आयुष्य सुकर झाले पाहिजे. समाधानी झाले पाहिजे. उद्योग बहरले पाहिजेत. माझा लाडका शेतकरी, लाडक्या बहीणी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ सुखावले पाहिजेत. सुरक्षीत महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र हेच आमचे लक्ष्य असल्याचे सांगत महाराष्ट्राच्या विकासाचा वेग आणखी वाढणार आहे. विरोधकांनी जनतेच्या कामांमध्ये राजकारण न आणता विकासयात्रेत सगळ्यांनीच सामील व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (७ मार्च) विधान परिषदेत केले.
विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ते म्हणाले, राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात महाराष्ट्राच्या विकासाचं जे स्पष्ट चित्र मांडलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमच्या नव्या सरकारची सुरूवातही दमदार झाली आहे. पहिल्या अर्थसंकल्पामध्ये त्याचं प्रतिबिंबही दिसेल.
आम्हाला दुप्पट वेगाने आणि चौपट क्षमतेने राज्याचा विकास करायचा आहे. राज्यातला जनतेचं कल्याण करायचे आहे. महायुतीच्या गेल्या अडीच वर्षांच्या काळात ऐतिहासिक अशी विकासकामे केली. कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून दिले. त्यामुळे आता आमची जबाबदारी अधिक वाढली आहे.
नव्या सरकारने पहिल्या दिवसापासून काम सुरू केलं आहे. सगळ्या विभागांचा शंभर दिवसांचा आढावा घेऊन आम्ही त्यांना पुढच्या पाच वर्षांची दिशा दिली असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आमच्या हृदयात मराठी आमच्या नसानसात मराठी असल्याचे त्यांनी सांगितले.
Eknath Shinde : कितीही संकटे आली तरी शिवसेनेला कोणी रोखू शकत नाही!
लाडक्या बहिणींनी आम्हाला भक्कम पाठिंबा दिल्याचे सांगत शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी विरोधकांनी सातत्याने अपप्रचार केला. या योजनेचे कुठलेही निकष बदलण्यात आलेले नाहीत. ज्या बहिणी पात्र आहेत, त्यांना कधीही अपात्र ठरवलं जाणार नाही. ही योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
वाहनांसाठी हाय सिक्यूरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट्स सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याविषयी देखील विरोधकांकडून चुकीची माहिती दिली जात आहे. महाराष्ट्राची इतर राज्यांशी तुलना केली तर हे दर आपल्या राज्यात जास्त नाहीत. इतर राज्यांमध्ये दर हे २०२०-२१ या कालावधीत निश्चित केले आहेत. पण राज्याचे दर हे आता ऑक्टोबर २०२४ मध्ये निश्चित झाले आहेत. तसेच, महाराष्ट्राचे दर हे जीएसटी आणि फिक्सिंग चार्जेस धरून आहेत. आपण जर इतर राज्यांची तुलना केली तर आपल्याकडच्या नंबर प्लेटचे दर हे कमीच आहेत, असेही उपमुख्यमंत्र्यांनी शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.