Three accused in Hiranwar massacre are still absconding : शेखूसह तीन आरोपी अद्यापही फरार
Nagpur कुख्यात शेखू खानला भाऊ सरोज खानच्या हत्याकांडाचा हिरणवार बंधूंना संपवून बदला घ्यायचा होता. त्यासाठी शेखूने १० लाख रुपयांची सुपारी गणेश कोवे आणि प्रथम शाक्य यांच्या टोळीला दिली होती. हिरणवार टोळीतील सदस्य गणेश फितूर झाल्यामुळेच पवन हिरणवारचा खून करण्यात शेखू टोळीला यश मिळाले, अशी माहिती सूत्रांनी दिली. हिरणवार हत्याकांडातील मुख्य आरोपी शेखूसह तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. पोलिसांनी चार आरोपींना अटक करुन दोन पिस्तूल जप्त केल्या आहेत. आरोपींना १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
दोन वर्षांपूर्वी शंकरनगर चौकात भरदिवसा शेखूचा भाऊ सरोज खानचा पवन हिरणवार टोळीने खून केला होता. तेव्हापासून शेखूला भावाच्या हत्याकांडाचा बदला घ्यायचा होता. त्यासाठी शेखू कितीही पैसे खर्च करायला तयार होता. दोनच महिन्यांपूर्वी हिरणवार टोळीचा म्होरक्या पवन कारागृहातून बाहेर आला होता. तेव्हापासूनच शेखू हा पवन आणि बंटीचा खून करण्याचा कट आखत होता. दोनदा प्रयत्न करुनही यश मिळत नव्हते.
शेवटी त्याने हिरणवार टोळीतील सदस्य गणेश कोवे यालाच कामाला लावण्याचे ठरवले. गणेश हा पवन आणि बंटी हिरणवारचा मित्र होता. पवनने बाबुलखेडा येथील पंचमुखी हनुमान मंदिरात दर्शनासाठी जायचे असल्याचे ठरवले. त्यासाठी गुरुवारी दुपारी ते दर्शनाला गेले. पवन आणि बंटी हिरणवार यांच्यासोबत टोळीतील सदस्य हिमांशू गजभीये, साहिल ऊर्फ सोनू शेंद्रे हे सुद्धा होते. शेखूने आरोपी प्रथम शाक्य, अधीराज कनोजिया, ललीत ऊर्फ अवी भुसारी आणि सिद्धार्थ ऊर्फ गणेश कोवे यांना हाताशी धरले. त्यांना १० लाख रुपये देण्याचे ठरले. आरोपींनीही १० लाखांत हिरणवार बंधूची टीप देण्याची सुपारी घेतली.
‘लाईव्ह लोकेशन’ केले सुरु
पवन आणि बंटीची गाडी आरोपी गणेश कोवे चालवत होता. त्याने आपल्या मोबाईलवरुन ‘लाईव्ह लोकेशन’ शेखू याला पाठवले. तसेच तो शेखूच्या नियमित संपर्कात होता. त्यानंतर कार कुठून आणि कोणत्या मार्गाने जाणार असल्याची टीप शेखूला गणेशने दिली. त्यावरुन शेखू आणि प्रथम, अधीराज, ललीत यांच्यासह अन्य दोन आरोपींनी हिरणवारच्या कारची पाठलाग करणे सुरु केले. शेखूच्या सांगण्यावरुन गणेशने कारचा वेग कमी केला, अशी माहिती सूत्रांनी दिली. खापरखेड्याच्या हद्दीत लोनखैरी रस्त्यावर तीन दुचाकींनी आलेल्या सहा जणांनी कारवर अंधाधुंद गोळीबार केला. यात पवनचा तीन गोळ्या लागून मृत्यू झाला तर बंटी हिरणवार थोडक्यात हुकला.