Promotion process of police personnel cancelled : पोलिस कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया रद्द
Yavatmal पोलीस अधीक्षक कार्यालयात अजूनही बाबुगिरीचा उपद्रव कायम आहे. वरिष्ठांना कायद्याचा सोयिस्कर अर्थ सांगून स्वतःचे उखळ पांढरे करणारे काही महाभाग येथे आहेत. यातूनच सेवानिवृत्तीच्या वाटेवर असलेल्या एकाने पोलिस शिपाई व जमादार यांच्या पदोन्नतीमध्ये सोयिस्कर उलटफेर केला होता.
पदोन्नतीला केवळ सेवा ज्येष्ठता हा निकष न ठेवता आरक्षणाच्या आधारावर पदोन्नतीची आकडेमोड करून पाहिली. ही बाब डावललेल्या कर्मचाऱ्यांनी पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सदोष पदोन्नतीच रद्द करण्यात आली आहे.
पोलिसांच्या आस्थापनेतील काही महाभागाचे कारनामे सर्वश्रुत आहे. पोलिस कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. शिस्तीचे खाते असल्याने लहान तक्रारी घेऊन वरिष्ठापुढे जाण्याचे शक्यतो टाळले जाते. याचा फायदा घेऊन पोलिस कर्मचाऱ्यांची अडवणूक होते. असाच प्रकार पोलिस शिपाई ते पोलिस जमादार व जमादार ते सहायक फौजदार पदोन्नती प्रक्रियेत झाला.
हितसंबंधातील नावे टाकण्यासाठी सेवा ज्येष्ठता डावलण्यात आली. यादी प्रसिद्ध करताना नियुक्तीचा दिनांक जाणीपूर्वक त्यात नमूद केला नाही. हा सावळा गोंधळ निदर्शनास आल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी सोमवारी एसपींची भेट घेऊन वास्तव त्यांच्या पुढे ठेवले.
Yavatmal Police : फितुरांमुळे भूमाफिया सुरक्षित, तपास पथकाला गुंगारा!
२०१७ च्या शासन निर्णयाप्रमाणे पदोन्नतीत आरक्षण दिले जात नाही. यात सेवा ज्येष्ठता हाच निकष ठेवला आहे. केवळ ज्या कोण्या कर्मचाऱ्याची चौकशी सुरू असेल, निलंबन व इतर स्वरूपाची कारवाई झाली असेल, अशा कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठता पदोन्नती देताना विशेष परवानगीची गरज पडते. चौकशी अहवालानंतरच पदोन्नती दिली जाते. मात्र, ५ मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या पदोन्नतीच्या यादीत उलटाच प्रकार घडला.
सेवा ज्येष्ठ असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती प्रक्रियेसाठी एमएससीआयटी प्रमाणपत्र मागवून घेतले. परंतु, त्यांचे यादीत नावच दिसले नाही. पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवेतील नियुक्ती कधी झाली याची पडताळणी केली असता, अनेकांना धक्का बसला. कमी सेवा असणाऱ्यांची नावे या यादीत होती.
अखेर हा उलटफेर एसपींच्या दरबारात जाऊन त्यांच्या निर्दशनास आणून देण्यात आला. आता येणारी पदोन्नती यादी ही निष्पक्ष व पारदर्शक असावी, अशी अपेक्षा सेवा ज्येष्ठ कर्मचारी करत आहेत. पदोन्नती प्रक्रियेतून १९९४ बॅचचे १३ सेवाज्येष्ठ कर्मचारी बाद झाले होते. या ऐवजी २००३-०४ बॅचचे कर्मचारी पदोन्नती यादीत समाविष्ठ केले होते. १९९४ च्या बॅचच्या कर्मचाऱ्यांना डावलत २००३-०४ बॅचचे कर्मचारी पदोन्नतीच्या यादीत आले होते. आता प्रक्रियाच थांबली आहे.