Debt restructuring scam discussed in the legislature : अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांवर कारवाईची मागणी
Akola अर्थसंकल्पीय अधिवेशनात अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्ज पुनर्गठन घोटाळा चांगलाच गाजला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी Amol Mitkari यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे या प्रकरणात बँकेच्या संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावर सहकार मंत्र्यांनी नवीन चौकशी समितीच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
२,३६७ शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्नित सेवा सहकारी सोसायट्यांच्या या कर्जदार सभासदांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा पूर्ण लाभ मिळू शकला नाही. २०१९ मध्ये जाहीर झालेल्या या योजनेअंतर्गत, थकित रक्कम २ लाखांपर्यंत असल्यास लाभ देण्यात येणार होता. मात्र, कर्ज पुनर्गठनामुळे शेतकऱ्यांना केवळ एका हप्त्याचा लाभ मिळाला, अशी तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या.
Ravikant Tupkar : शेतकरी निघाले मुंबईला; अरबी समुद्रात सातबारे बुडवणार!
त्यामुळे सहकार विभागाने प्राथमिक चौकशी केली. या चौकशीत, शेतकऱ्यांचे संमतीपत्र न घेता परस्पर पुनर्गठन करण्यात आले असल्याचे उघड झाले. परिणामी, १३.६४ कोटी रुपयांच्या थकीत कर्जामुळे संबंधित शेतकरी लाभापासून वंचित राहिले.
कर्ज पुनर्गठनाच्या प्रश्नांवर सहकार मंत्र्यांनी उत्तर दिले. त्रोटक अहवाल दिल्याप्रकरणी संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार मिटकरी यांनी शेतकऱ्यांचे शोषण झाल्याचा आरोप केला. यावर सहकार मंत्र्यांनी उत्तर दिले की, १०३ सोसायट्यांची निवडणूक झाली. त्यावर नवीन संचालक मंडळ आहे.
बँकेवर प्रशासक नियुक्तीबाबत रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे नवीन चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्व प्रकारच्या कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही सहकार मंत्र्यांनी दिली. संबंधित ११२ सहकारी सोसायट्या तात्काळ बरखास्त करण्यात आल्या.
त्यानंतर या सोसायट्यांचे पदाधिकारी, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक व्यवस्थापन, संचालकांविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार मिटकरी यांनी केली. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभापासून बँकेने परस्पर केलेल्या पुनर्गठनामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली.