Action taken against District Sports Office for non-payment of taxes : पाच वर्षांपासून करच भरला नाही; पत्रव्यवहाराला प्रतिसाद नाही
Wardha वारंवार पत्रव्यवहार करूनही कराचा भरणा न करणाऱ्या जिल्हा क्रीडा कार्यालयाला पालिकेच्या कर अधिकाऱ्यांनी टाळे ठोकले. पाच वर्षांपासून कराचा भरणा न करण्यात आल्याने ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात आले आहे. शहरात कर बुडविणाऱ्यांची संख्या हजारांत आहे. यात शासकीय कार्यालयेही मागे नसल्याचे झालेल्या कारवाईतून दिसून येत आहे.
आर्थिक वर्ष संपत आले आहे. त्यामुळे पालिकेने करवसुली मोहीम तीव्र केली आहे. यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. वर्धा शहरात २०११ च्या आकडेवारीनुसार २५ हजार ४९७ मालमत्ताधारक आहेत. यातील अनेकांनी कराचा भरणा न केल्याने परिणामी १२ कोटी १९ लाख रुपयांचा कर नागरिकांकडे थकला होता. यात नोटीस देऊनही कराचा भरणा न करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
MLA Siddharth Kharat : जलजीवन मिशन योजनेत गैरप्रकार, विधानसभेत गाजला विषय
यात शासकीय कार्यालयांनाही सोडले नसल्याने यंदा करवसुलीची उद्दिष्टपूर्ती होणार असे एकंदरीत दिसून येत आहे. नगरपरिषदेचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी नागरिकांनी ३१ मार्चपूर्वी भरणे बंधनकारक आहे. ही तारीख टळून गेल्यास थकीत रकमेवर दरमहा दोन टक्के दंड आकारला जातो. कराचा भरणा करण्यासाठी नागरिकांना वेळोवेळी सूचना देण्यात येत आहे. मात्र, या सूचनांचा नागरिकांवर परिणाम होत नसल्याने शहरात धडक कर वसुलीसाठी पथक नेमण्यात आली आहे.
शहरातील निवासी, वाणिज्य, शैक्षणिक, शासकीय मालमत्ता करापोटी १२ कोटी १९ लाख रुपयांची मागणी आहे. यात थकबाकी ५ कोटी ४५ लाख रुपये आहे. चालू मागणी ६ कोटी ७४ लाख रुपये आहे. यात आतापर्यंत केवळ ६ कोटी १२ लाख रुपयांची वसुली झाली आहे. मागणीच्या ५० टक्के रक्कम अद्याप थकलेलीच आहे.
Mahayuti Government : मोर्शीतील मत्स्यविज्ञान महाविद्यालयासाठी १६५ कोटी मंजूर
पालिकेच्या कर अधिकाऱ्यांनी दुपारी १ वाजताच्या सुमारास जिल्हा क्रीडा कार्यालयावर धडक देत कार्यालयाला टाळे ठोकले. या घटनेने सुस्तावलेला क्रीडा विभाग जागा झाला. जप्तीची कारवाई टाळण्यासाठी धनादेश देण्याचे आश्वासन दिले. मात्र, दुपारी चार वाजेपर्यंत धनादेश मिळाला नसल्याने ही कारवाई रेंगाळली असल्याचे चित्र दिसून आले. इतर कार्यालयांचीही वसुली होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.