Accusations in the Annual general Meeting : विकासकामांवरील चर्चेपेक्षा गोंधळच जास्त; नागरिकांमध्ये नाराजी
Buldhana एकतर सात वर्षांनी पंचायत समितीची आमसभा होते आणि त्यातही वादावादीच जास्त होते. लोणार पंचायत समितीच्या आमसभेतील हे चित्र दुर्दैवी होते. अगदी एखाद्या शाळेतील ऑफ पिरिएडमध्ये होणाऱ्या गोंधळासारखे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे विकासाची आस लावून बसलेल्या नागरिकांच्या हाती मात्र अशा परिस्थितीत काहीच लागत नाही.
सात वर्षांनंतर आयोजित करण्यात आलेल्या लोणार पंचायत समितीच्या आमसभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांच्या समस्या सोडवण्याऐवजी सभा आठवडी बाजारासारखी वाटल्याने उपस्थितांमध्ये नाराजी पसरली. ही सभा आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आमदार मनोज कायंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेश मापारी, भाजप तालुकाध्यक्ष भगवान सानप, तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी व स्थानिक प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
सभेत विविध विकासकामे आणि योजना यांचा आढावा घेतला जाणार होता. मात्र, नागरिकांनी पाणीटंचाई, रस्त्यांची दुर्दशा आदी स्थानिक समस्यांबाबत तातडीने उत्तर मिळावे. यासाठी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे सभेचे उद्दिष्ट बाजूला पडले.
यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी वार्षिक अहवाल सादर केले. काही अधिकाऱ्यांनी निधीअभावी प्रकल्प रखडल्याचे स्पष्ट केले. मात्र, नागरिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभा काही काळ गोंधळमय झाली.
विकासकामांवर सखोल चर्चा अपेक्षित असतानाही नागरिकांच्या रोषामुळे सभा नियोजित स्वरूपात पार पडू शकली नाही. प्रशासनाने या समस्या गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी उपस्थितांनी केली.