Approval of Rs 3 crore for taluka level project : प्रत्येक तालुक्यासाठी तीन कोटींच्या प्रस्तावाला मान्यता, पालकमंत्र्यांचा पुढाकार
Akola जिल्ह्यातील प्रत्येक तालुका क्रीडा संकुलासाठी प्रत्येकी ३ कोटी रुपये निधीच्या प्रस्तावाला राज्य क्रीडा विकास समितीने मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलांचा अनुशेष दूर व्हावा यासाठी राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पत्राद्वारे निधीची मागणी केली होती, ती आता पूर्ण झाली आहे.
त्यामुळे तालुक्यातील खेळाडू आणि क्रीडाप्रेमींना अत्याधुनिक सुविधांनी युक्त क्रीडांगण उपलब्ध होणार आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, पातूर, बाळापूर या ठिकाणी तालुका क्रीडा संकुलांच्या विकासासाठी प्रत्येकी ३ कोटी रुपये निधी मिळणार आहे. यामुळे याठिकाणी आधुनिक क्रीडा संकुले उभारली जातील आणि खेळाडूंना उत्तम सुविधा मिळतील.
PM Modi Nagpur Visit : पंतप्रधान मोदी संघभूमित, स्मृति मंदिराला भेट!
ॲड. फुंडकर यांनी या संदर्भात राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानंतर राज्य क्रीडा विकास समितीच्या माध्यमातून या निधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यात इनडोअर व आऊटडोअर क्रीडा प्रकारांमध्ये अनेक खेळाडू आहेत. क्रीडा संकुलांसाठी मिळालेल्या निधीमुळे ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना हक्काचे स्टेडियम मिळणार आहे.
याद्वारे जिल्ह्यात खेळांना पोषक वातावरण मिळेल, असा विश्वास पालकमंत्री ॲड. फुंडकर यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची ही दीर्घकालीन मागणी पूर्ण झाल्याने क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. राज्य शासनाने क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंना समान संधी मिळावी, यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये आधुनिक क्रीडा संकुले उभारली जात आहेत.
अकोला जिल्ह्यातील खेळाडू अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली चमक दाखवत आहेत. त्यांना अधिक चांगल्या सुविधा आणि प्रशिक्षण देण्यासाठी ही संकुले उपयुक्त ठरणार आहेत. स्थानिक पातळीवर क्रीडा स्पर्धा आणि प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यासही मदत होईल. यामुळे जिल्ह्यातून अनेक नवे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची संधी मिळेल.