Instructions from Revenue Minister Chandrashekhar Bawankule : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश
Mumbai : मुंबईत बनावट नकाशे सादर करुन महानगरपालिकेमार्फत बांधकामाची परवानगी मिळवलेली बांधकामे तातडीने निष्कासित करावीत. त्याचप्रमाणे या अनुषंगाने स्थापन केलेल्या एसआयटीद्वारे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
विधिमंडळाच्या सभागृहात याबाबत उपस्थित झालेल्या मुद्द्यांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. आमदार योगेश सागर, सुनील शिंदे बैठकीस प्रत्यक्ष तर ॲड. अनिल परब, सचिन अहिर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी, ऑनलाईन उपस्थित होते.
आयुक्त गगराणी यांनी याबाबत माहिती देताना बांधकाम परवानगी ऑनलाईन दिली जात असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या परवानगीच्या आधारे केलेली बांधकामे ही अनधिकृत ठरतात, अशी ४५७ बांधकामे आहेत. त्यांपैकी ६६ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. इतरांना नोटीस देण्यात येईल.
Chandrashekhar Bawankule : महसूल मंत्र्यांच्या बनावट लेटरहेडवर जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले पत्र !
एसआयटीकडेदेखील तक्रार दाखल करण्यात येईल. एसआयटीमार्फत आतापर्यंत झालेल्या चौकशीनुसार २० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती एसआयटीमार्फत देण्यात आली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महानगरपालिकेमार्फत जुलै महिन्यापूर्वी ही कार्यवाही पूर्ण करण्याची सूचना यावेळी केली. या कार्यवाहीकडे माझे जातीने लक्ष राहणार असल्याचेही मंत्री बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
Chandrashekhar Bawankule : वडेट्टीवार पराभवाच्या मानसिततेतून बाहेर आलेले नाहीत !
मुंबई शहरात आणखी अशी काही बांधकामे आहे का, याचाही तपास करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यंत्रणेला दिले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल त्यांनी मागवला आहे. त्यामध्ये असले काही प्रकार आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. गैरप्रकार करणाऱ्यांना सोडण्यात येणार नाही, असेही ते म्हणाले.








