Social media is also under close scrutiny, keeping Nagpur safe is our responsibility said Chandrashekhar Bawankule : सोशल मिडियावरही करडी नजर, नागपूर सुरक्षित ठेवणे आमची जबाबदारी
Nagpur : नागपूर शहराच्या महाल परिसरात मागील काळात दंगल उसळली होती. त्यानंतर राम नवमीच्या उत्सवाबाबत लोकांच्या मनात शंका-कुशंका निर्माण झाल्या होत्या. पण रामनवमी शोभायात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था लावलेली आहे. जर कोणी काही करण्याचा प्रयत्न केला, तर कुणालाही सोडणार नाही, असा सज्जड दम राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
नागपुरात आज (५ एप्रिल) पत्रकारांशी बोलताना मंत्री बावनकुळे म्हणाले, आम्ही सोशल मीडियावरती नजर ठेवली आहे. सोशल मीडियावर कोण काय पोस्ट करत आहे, यावरही आमचं बारीक लक्ष आहे. इन्फ्ल्यूंसर यांच्यावरही आमचे लक्ष आहे. नागपूरला सुरक्षित ठेवणे, ही आमची जबाबदारी आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत.
संजय राऊत यांच्याबद्दल विचारले असता, आम्हाला उबाठांच्या लोकांना विचारायची गरज नाही. आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आम्हाला कुणाची काही गरज नाही. उबाठाचे लोक आमच्याकडे येत आहेत. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करून विरोधकांनी महाराष्ट्राच्या जनतेशी बेईमानी केली असल्याचे बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी ज्यांची मते घेतली, त्या मतांशी त्यांनी बेइमानी केली आहे. मुंबई महानगरपालिकेचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरेंनी घेतलेले हे पाऊल आहे. जनता उद्धव ठाकरे यांना माफ करणार नाही. कारण हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पतन उद्धव ठाकरे यांनी केलेले आहे.
काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केलेल्या टिकेबाबत ते म्हणाले, वडेट्टीवार यांनी बालीशपणा सोडला पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलवर चौकशीचे आदेश आम्ही दिले आहे. ज्या-ज्या गोष्टी केल्या आहेत, त्यावर मी स्पष्ट भूमिका घेतली आहे. मंगेशकर हॉस्पिटलमध्ये झालेली अनियमितता अजिबात मान्य नाही. त्यावर निश्चितपणाने कारवाई करू. या राज्यातील कुठल्याही हॉस्पिटलमध्ये पैशांकरता कुणाचा जीव गेल्याचे दिसून आले, तर कायद्याने त्यांचे परवाने रद्द केले जातील, असेही ते म्हणाले.
Chandrashekhar Bawankude : मुंबईतील बनावट नकाशे दाखवून केलेली बांधकामे निष्कासित होणार !
१२ लाख कार्यकर्त्यांना संबोधित करणार फडणवीस..
उद्या (६ एप्रिल) आमचा स्थापना दिवस आहे. उद्या दोन वाजता देवेंद्र फडणवीस दहा ते बारा लक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. उद्या सकाळी नऊ वाजता भाजपच्या नागपूरच्या जिल्हा विभागीय कार्यालयाचे उदघाटन असल्याचे मंत्री बावनकुळे म्हणाले.
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून उटलेल्या वादंगाबाबत विचारले असता, केंद्राने कायदा पास केला. राष्ट्रपती यांची मंजुरी मिळाल्यानंतर ते विधेयक आमच्याकडे येईल. आमच्याकडे आल्यानंतर आम्ही कायद्याचा अभ्यास करू. त्या कायद्यात काय लिहिले आहे, त्यानुसार आम्ही आमचं काम करू. कायदा आमच्याकडे आल्याशिवाय राज्याची भूमिका काय असेल, जिल्हाधिकारी यांची भूमिका काय असेल, महसूल विभागाची भूमिका काय असेल, हे सांगता येणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.