Farmer in Murmadi commits suicide by hanging : कर्जबाजारीपणामुळे घेतला निर्णय; किंकाळ्यांनी हादरले गाव
Bhandara लाखांदूर तालुक्यातील मुरमाडी गावातील एका शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. एका लाकडी मयालीला नायलॉनच्या दोराने गळफास घेत त्याने जीवन संपवले. हेमराज शंकर वाघ (वय ५७) या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
हेमराज वाघ यांच्याकडे केवळ सव्वाएकर शेती होती. त्या शेतीवरच त्यांचं संपूर्ण आयुष्य, कुटुंब आणि स्वप्नं टिकून होती. दरवर्षी जसे रब्बी आणि खरीप हंगामांची शेती त्यांनी केली, तसंच यंदाही धान लावला. पण निसर्गाने साथ दिली नाही. उत्पन्नाऐवजी नुकसान आणि त्यात वाढणाऱ्या कर्जाचं ओझं, यामुळे हेमराज त्रासले होते.
कधी नातलगांकडून उधारी, कधी सावकाराकडून उसने पैसे घेत शेती जगवण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत धडपड केली. पण रब्बी हंगामातील धान पिकालाही रोग लागला आणि उरलेलं आशेचं धूसर सावलीही नाहीशी झाली.
घटनेच्या दिवशी हेमराज आणि त्यांची पत्नी दोघेच घरी होते. पत्नी सकाळच्या विधीसाठी बाहेर गेली आणि ती परत आली, तेव्हा घरातला दृश्य अंगाचा थरकाप उडवणारा होता. हेमराज गळफास लावलेल्या अवस्थेत मयालीला लटकत होते. किंकाळ्यांनी गाव हादरलं आणि बघता बघता बातमी वाऱ्यासारखी पसरली.
Farmer Suicide : पुरस्कार देता, म्हणून शेतीला पाणी देणार नाही का?
हेमराज यांचे दोन्ही पाय जमिनीला टेकलेले होते आणि पाठीमागे प्लास्टिकची खुर्ची होती. त्यामुळे ही आत्महत्या खरी आहे की काही गूढ प्रकार दडलेला आहे, याबद्दल शंका उपस्थित होत आहेत. पोलिसांनी पंचनामा केला असून, शवविच्छेदन अहवालानंतरच खरी स्थिती स्पष्ट होणार आहे.








