Deputy Chief Minister Eknath Shinde, MLAs, MPs and ministers will be felicitated on Thursday itself : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार, खासदार व मंत्र्यांचा गुरूवारीच होणार सत्कार
Maharashtra Politics : शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत यांच्यावरून सध्या राज्यातील राजकारण तापतंय. भारतीय जनता पक्षात शिवसेनेचा ‘उदय’ होणार अशा टीका महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सातत्याने केल्या जात आहेत. त्यातच गुरूवारी (२३ जानेवारी) मोठा राजकीय भुकंप होणार असल्याचे सुतोवाच शिवसेनेचे उपनेते राहुल शेवाळे यांनी केले आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
विरोधकांनी केलेल्या आरोपांबाबत पत्रकारांनी विचारले असता, शेवाळे म्हणाले की उबाठाचे १५ आणि काँग्रेसचे १० आमदार शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. येत्या २३ जानेवारी रोजी मोठा राजकीय भूकंप होईल. त्यामुळे धास्तावलेले विरोधक शिवसेनेबाबत खोट्या बातम्या पसरवत आहेत. ‘उदय’ कोणाचा होणार, यावर चर्चा करण्यापेक्षा उबाठा गटाच्या अस्ताबाबत काळजी करावी, अशी घणाघाती टीका शेवाळे यांनी संजय राऊतांवर केली.
महाविकास आघाडी ही स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी झाली होती. ज्यावेळी सत्ता जाते आणि स्वार्थ दिसून येत नाही, तेव्हा त्यात बिघाडी झाल्याचे दिसून येते. स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि परिवाराला वाचवण्यासाठी काही पक्षांचे प्रमुख हातपाय पसरताना दिसत आहेत, अशी टीका शेवाळे यांनी उबाठावर केली.
Sudhir Mungantiwar : चर्चा नव्हे कृती ! कापडी पिशव्या वाटून दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश
एकनाथ शिंदे यांचा सत्कार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबवून शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अडीच कोटी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले. त्यासाठी एकनाथ शिंदे यांचा लाडक्या बहिणींच्या हस्ते भव्य नागरी सत्कार होणार आहे. हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी शिवसेनेकडून वांद्रे कुर्ला संकुल येथे हा सत्कार सोहळा आयोजित केल्याची माहिती शिवसेना उपनेते राहुल शेवाळे यांनी दिली.
बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेवाळे बोलत होते. यावेळी सचिव सुशांत शेलार, उपनेत्या व प्रवक्त्या शीतल म्हात्रे, प्रवक्त्या अॅड. सुशीबेन शहा, युवा सेना सरचिटणीस अमेय घोले उपस्थित होते. शेवाळे म्हणाले की, जून २०२२ मध्ये शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक निर्णय घेत वंदनीय बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केला होता. तो संकल्प लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पूर्ण झाला. त्यामुळे शिवसैनिक आणि राज्यातील तमाम नागरिकांच्यावतीने एकनाथ शिंदे आणि निवडून आलेल्या सर्व आमदार आणि खासदारांचा भव्य नागरी सत्कार केला जाणार आहे.
लाडक्या बहीणी करतील सत्कार
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लोकसभेत शिवसेनेचे ७ खासदार निवडून आले तर विधानसभेत शिवसेनेचे ५७ आमदार निवडून आले. विधानसभेत शिवसेनेला उबाठाच्या तुलनेत १५ लाख ६३ हजार ९१७ मते जास्त मिळाली. राज्यातील मतदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. पक्षाने हा विजय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना समर्पित केल्याचे शेवाळे म्हणाले. महायुतीच्या विजयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. त्या लाडक्या बहिणींच्या हस्ते एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांचा सत्कार होईल. यावेळी सोनू निगम व अवधूत गुप्ते यांचा संगिताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे शेवाळे यांनी सांगितले.
BJP-NCP wins Panchayat Samiti Chairman election : भाजपचाच डंका; राष्ट्रवादीसोबत समीकरण कायम
शिवसेना आणि मुंबई महापालिकेचे भावनिक नातं आहे. मुंबईकरांनी नेहमीच शिवसेनेला धनुष्यबाणाला मतदान करुन शिवसेनेचा महापौर निवडून दिला आहे. पुन्हा मुंबई महापालिकेवर भगवा फडकवून महायुतीचा महापौर करण्याचा संकल्प शिवसेनेकडून येत्या २३ जानेवारी रोजी केला जाईल, असे शेवाळे म्हणाले. या संकल्पपूर्तीसाठी २४ जानेवारी ते ३० जानेवारी दरम्यान मुंबई शहरात शाखानिहाय बैठका घेण्यात येतील.
मुंबई महापालिकेसाठी नवी कार्यकारीणी
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबई शहरात नवीन कार्यकारिणीची घोषणा केली जाईल. या कार्यकारिणीच्या माध्यमातून महापालिकेची निवडणूक लढवली जाईल, असे शेवाळे म्हणाले. ९ फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने पक्षाकडून २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या सदस्य नोंदणी मोहीम आणि मतदारांचे आभार मानण्यासाठी जिल्हानिहाय सभा आयोजित केल्याचे शेवाळे म्हणाले.