‘Kahna Kya chahte Ho?’ Dialogue multifaceted life journey ; ‘कहना क्या चाहते हो?’ डायलॉग आजरामर, बहुआयामी जीवनप्रवास
Thane : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन झाले आहे. ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
अच्युत पोतदार हे केवळ अभिनेता नव्हते तर शिक्षण, सैन्यदल आणि कॉर्पोरेट क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान राहिले. भारतीय सैन्यात कॅप्टन पदावर सेवा बजावल्यानंतर ते इंडियन ऑइल कंपनीत कार्यरत होते. अभिनयाची आवड त्यांना अखेर चित्रपटसृष्टीकडे घेऊन आली आणि 1980 च्या दशकात त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले.
Prakash Ambedkar : अन्याय खरंच दूर करायचा आहे की केवळ दिखावा आहे?
अच्युत पोतदार यांनी आपल्या कारकिर्दीत 125 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. आक्रोश, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है, अर्ध सत्य, तेजाब, परिंदा, राजू बन गया जेंटलमन, दिलवाले, रंगीला, वास्तव, भाई, दबंग 2 आणि व्हेंटिलेटर या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांना प्रेक्षकांची दाद मिळाली.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘3 इडियट्स’ चित्रपटात आमिर खानसमवेत त्यांनी प्राध्यापकाची भूमिका साकारली होती. “क्या बात है!” आणि “कहना क्या चाहते हो?” हे त्यांचे डायलॉग आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. सोशल मीडियावर हे संवाद मीम्सच्या स्वरूपात प्रचंड लोकप्रिय आहेत.
चित्रपटांव्यतिरिक्त अच्युत पोतदार यांनी छोट्या पडद्यावरही मोठे योगदान दिले. वागले की दुनिया, माझा होशील ना, मिसेस तेंडुलकर आणि भारत की खोज यांसारख्या मालिकांमधील त्यांच्या अभिनय प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
चार दशकांहून अधिक काळ आपल्या बहुआयामी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अच्युत पोतदार यांचे योगदान भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे.








