amol mitkari announces ‘justice for dada’ protest statewide : डीजीसीएच्या प्राथमिक अहवालावर संशय, ब्लॅक बॉक्स आणि सीसीटीव्ही फुटेजबाबत प्रश्नचिन्ह
Akola राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला अडीच महिने उलटूनही तपासाचे सत्य अद्याप समोर आले नसल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. “अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी मी एकटाच लढलो, मात्र इतर आमदारांची अपेक्षित साथ मिळाली नाही,” अशी खंत व्यक्त करत त्यांनी आता ‘जस्टिस फॉर दादा’ आंदोलनाची घोषणा केली आहे.
अमोल मिटकरी यांनी एका लाईव्ह संवादातून आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, “अधिवेशनादरम्यान शंभुराज देसाई यांच्या साताऱ्यातील प्रकरणावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सुमारे ४० आमदार एकत्र आले होते. मात्र, अजितदादांच्या अपघाताच्या तपासासाठी मी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला बसलो असताना, विनंती करूनही कुणीही साथ दिली नाही. त्या वेळी सर्व आमदार एकत्र आले असते, तर आज तपासाचे चित्र वेगळे असते.”
Sanjay Gaikwad Vs. Vijayraj Shinde : १५० कोटी रुपयांचा हिशेब अन् १०० कोटींचा दावा!
तपासातील तांत्रिक बाबींवरही मिटकरी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. “केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी १५ दिवसांत ब्लॅक बॉक्सचा डेटा जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. मग अडीच महिने उलटूनही तो डेटा समोर का आलेला नाही? विमानतळावरील गेट क्रमांक ८ पासून विमानात बसण्यापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज का जाहीर केले जात नाही? विमानात नेमके पाच प्रवासी होते की सहा, हे सरकारने स्पष्ट करावे,” अशी मागणी त्यांनी केला.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) प्राथमिक अहवालातील विसंगतींकडेही मिटकरी यांनी लक्ष वेधले. अपघातस्थळी झाड असल्याचा उल्लेख अहवालात करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात तेथे कोणतेही झाड नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, पायलट कोण होता आणि विमानात नेमके किती लोक होते, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी अमोल मिटकरी आता राज्यभर जनआंदोलन उभारणार आहेत. ‘जस्टिस फॉर दादा’ या अभियानांतर्गत जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर यात्रा काढण्यात येणार असून, प्रत्येक ग्रामसभेत चौकशीच्या मागणीचा ठराव मंजूर करून तो मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे. “अजितदादांना न्याय मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
School bus fare : शालेय बस भाडे नियंत्रणासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
दरम्यान, २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. त्यानंतरपासून अमोल मिटकरी सातत्याने या अपघाताच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांनी सभागृहातही या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर अजित पवारांचा फोटो हातात घेऊन एकट्याने आंदोलन केले होते. विशेष म्हणजे, त्या वेळी त्यांच्या पक्षातील कोणताही आमदार त्यांच्या सोबत नव्हता.








