Ajit Pawar apologizes; withdraws controversial statement emphasizing development : अजित पवारांची दिलगिरी; वादग्रस्त वक्तव्य मागे घेतलं
Akola : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या प्रचाराने राज्यभर तापलेले राजकीय वातावरण आणखी रंगत असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल खुली दिलगिरी व्यक्त केली आहे. आंबेजोगाई येथील प्रचारसभेत विरोधकांवर टीका करताना नगरांच्या विकासावरून केलेल्या भाषणात त्यांनी “भिकार” हा शब्द वापरला होता. या वक्तव्यावरून मोठी राजकीय खळबळ उडाल्यानंतर अकोल्यातील प्रचारसभेत पवारांनी तो शब्द मागे घेत स्वतःची भूमिका स्पष्ट केली. “शहरांच्या अवस्थेबद्दल बोलताना माझ्याकडून एक चुकीचा शब्द वापरला गेला. तो शब्द मी वापरायला नको होता. त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो,” अशा शब्दांत त्यांनी सभेत माफी मागितली.
अकोल्यातील मोठ्या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की काही शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी त्यांच्या भागातील विकासाबद्दल सांगितले असून, जिथे कुठे काही राहिले असेल तिथे ते स्वतः लक्ष घालतील. “आम्ही तुमचेच आहोत. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठीच या पदांवर आहोत. आपला मुख्य उद्देश विकास आहे. जसा विकास आम्ही पिंपरी चिंचवड व बारामतीमध्ये केला, तसाच विकास इथे करायचा आहे,” असे पवारांनी सांगितले. विकासाच्या मुद्द्यावरून त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत निवडणूक आश्वासन थातुरमातुर नसेल, तर पूर्णत्वास जाईल, असेही ते म्हणाले.
Dispute in Shinde group : जागा घेणारा माणूस त्या लायकीचा आहे का?
आपल्या वादग्रस्त विधानाबाबत पुन्हा भाष्य करताना अजित पवारांनी सांगितले, “वेगवेगळ्या शहरांमध्ये एक बकालपणा आहे. मी त्या दिवशी ‘भिकार’ हा शब्द वापरला, तो वापरायला नको होता याची मला जाणीव आहे. म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. पण शहरांमध्ये बकालपणा नसला पाहिजे हा माझा भूमिकेवर मी ठाम आहे. आपण आपल्या शहरांचा विकास करू, बकालपणा दूर करू.”
राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देताना पवारांनी विरोधकांवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. “काही नेते येतात आणि सांगतात की असं करा, तसं करा. पण त्यांच्या शहरांची अवस्था पाहिली तर घाण, अस्ताव्यस्त आणि अकार्यक्षमता दिसते. मी सांगितलेला शब्द चुकीचा होता, पण शहरांच्या स्थितीबद्दलची वस्तुस्थिती बदलली पाहिजे हे तितकेच खरे आहे,” असे ते म्हणाले.
Gulabrao Patil on Ajit Pawar : ‘दुसऱ्यांची पोरं आपली सांगू नका’!
निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या विविध पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करून चाललेल्या तीक्ष्ण प्रचारांमध्ये पवारांनी केलेल्या दिलगिरीच्या घोषणेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. विरोधकांच्या टीकेनंतर किंवा राजकीय दबावामुळे नव्हे तर विकासाचा मुद्दाच आपल्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने माफी मागत असल्याचा दावा त्यांनी सभेत केला. निवडणुकीत वातावरण तापत असतानाच अजित पवारांची ही भूमिका पुढील राजकीय समीकरणांवर नेमका कसा परिणाम करेल याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
____








