Ajit Pawar death news : ‘दादा मध्यरात्रीही फोन करायचे…’; राजेंद्र शिंगणेंकडून आठवणींना उजाळा

Rajendra Shingane recalls past memories : फोनवरील ती चर्चा अखेरची ठरली; कॅबिनेटमधील समावेशाचीही दिली आठवण

Sindkhedraja काही माणसं पदामुळे मोठी होत नाहीत, तर त्यांच्या सहवासामुळे इतर माणसं घडत जातात. अजित पवार यांच्याविषयी बोलताना माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा स्वर नकळत भावूक होतो. पहिली भेट, सोबतचा प्रदीर्घ राजकीय प्रवास आणि अखेरचा फोन—या साऱ्या आठवणींना त्यांनी हळवेपणाने उजाळा दिला.

सन १९९३–९४ मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालकपदापासून सुरू झालेला हा सहवास तब्बल तीन दशकांहून अधिक काळ अखंड राहिला. विदर्भातील संचालकांनी एकत्र येत अजित पवार यांना राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न केले. त्याच काळात २०१० मध्ये अजित पवार यांनी डॉ. शिंगणे यांच्या जुन्या निवासस्थानी भेट दिली आणि तेथूनच या नात्याची खरी सुरुवात झाली, असे शिंगणे सांगतात.

Ajit Pawar Death News : अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बाजार समित्या ‘मौन’; लिलाव आणि व्यवहार आज पूर्णपणे बंद

यानंतर आमदारकी, मंत्रिमंडळातील सहकार्य, राजकीय संघर्ष—सर्व टप्प्यांत अजित पवार यांचा स्वभाव मात्र एकसारखाच राहिला; कोणावरही राग न धरता पुढे जाण्याचा. २०१४ मध्ये निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही, ‘डॉक्टर, तुम्ही उभं राहिलंच पाहिजे,’ असा आग्रह करणारे अजित पवारच होते. २०१९ च्या राजकीय उलथापालथीनंतरही दोघांतील नात्यात कधी दुरावा आला नाही.

‘कॅबिनेटमध्ये माझा समावेश होणार, ही पहिली बातमी नेहमी दादाच द्यायचे,’ असे सांगताना शिंगणेंचा आवाज थरथरतो. मध्यरात्री बारा-एक वाजताही फोन करून ते आश्चर्याचा सुखद धक्का द्यायचे, अशा आठवणी ते सांगतात.

Ajit Pawar death news : मेट्रोपासून अष्टविनायक मार्गापर्यंत दादांच्या कामांचा ठसा!

अजित पवारांकडून शिकलेली सर्वांत मोठी शिस्त म्हणजे वेळेचे महत्त्व. ‘आज मी कुठेही वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न करतो. किमान ९५ टक्के तरी वेळ पाळतो, ते केवळ दादांमुळे,’ असे ते अभिमानाने नमूद करतात. जिल्हा बँक अडचणीत असताना सॉफ्ट लोनसाठी त्यांनी युद्धपातळीवर केलेले प्रयत्न आजही त्यांच्या स्मरणात ताजे आहेत.

‘दादा मुख्यमंत्री झाले असते, तर त्यांनी केवळ सत्ता सांभाळली नसती, तर राज्याला स्पष्ट दिशा दिली असती,’ असे भावूक मतही डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केले.

नुकत्याच झालेल्या सिंदखेडराजा नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर नगराध्यक्ष निवडून आल्याबद्दल अजित पवार यांनी स्वतः फोन करून शिंगणे यांचे अभिनंदन केले. ‘इतक्या धामधुमीत त्यांनी फोन केला… तेच आमचं शेवटचं बोलणं ठरलं,’ असे सांगताना डॉ. शिंगणे गहिवरले.

‘माणूस जातो, आठवणी उरतात… पण दादा गेले, हे केवळ एका व्यक्तीचं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान आहे,’ असे म्हणत ते थांबतात—आणि शब्दांआड दडलेली हुरहूर अधिक बोलकी ठरते.