APMCs across the state remain shut to pay tribute : पुणे, नाशिक, अहिल्यानगरसह प्रमुख बाजारपेठांत शुकशुकाट; शेतकऱ्यांना माल न आणण्याचे आवाहन
Pune उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल असून, त्यांच्या सन्मानार्थ राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी (APMC) गुरुवारी आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून कृषी व पणन क्षेत्रावर आपली छाप सोडणाऱ्या अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शेतकरी, व्यापारी आणि हमाल-मापाडी संघटनांनी उत्स्फूर्तपणे व्यापार स्थगित ठेवला आहे.
अजितदादांच्या राजकीय कारकिर्दीत पुणे जिल्ह्याचा आणि विशेषतः बाजार समितीचा मोठा वाटा होता. त्यामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने गुरुवारी कडकडीत बंद पाळला आहे. मुख्य बाजार आवारातील फळे-भाजीपाला, पान बाजार, गुळभुसार, फुलांचा बाजार यासह उपबाजार असलेले मोशी, मांजरी आणि खडकी येथील व्यवहारही ठप्प आहेत. बाजार समिती आवारातील भुईकाटा केंद्र आणि पेट्रोल पंप विभागही सुरक्षेच्या आणि दुखवट्याच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आले आहेत.
कांदा आणि धान्य बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील बाजार समित्यांनीही दादांना मानवंदना दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत आणि विंचूर उपबाजारातील कांदा व सर्व प्रकारच्या शेतीमालाचे लिलाव आज होणार नाहीत. येथील मुख्य बाजार समितीसह नेप्ती उपबाजारातील कांदा लिलाव आणि भुसार विभागाचे कामकाज पूर्णपणे स्थगित करण्यात आले आहे. मराठवाड्यातील महत्त्वाच्या जालना बाजार समितीनेही किराणा व भुसार मार्केटचे व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
बाजार समिती प्रशासनाने आदल्या दिवशीच शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी न आणण्याचे आवाहन केले होते. ३० जानेवारीपर्यंत राज्य सरकारने शासकीय दुखवटा जाहीर केला असल्याने, प्रशासकीय पातळीवरही व्यवहार संथ आहेत. राजकारणात सत्तेवर असताना प्रशासनावर वचक ठेवणारे अजितदादा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमीच संवेदनशील राहिले. त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर केवळ शासकीय आदेश म्हणून नव्हे, तर एक ऋणानुबंध म्हणून बाजार समित्यांनी स्वतःहून व्यवहार थांबवले आहेत. बाजार समित्या बंद असल्या तरी आरोग्य, पोलीस आणि अग्निशमन यांसारख्या अत्यावश्यक सेवा राज्यभरात सुरळीत सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.








