Chief Engineer targeted by NCP : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला घेराव
Nagpur महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांनी अजितदादांवर नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नाहीत, असा आरोप केला होता. त्यानंतर चक्र फिरले आणि दोघेही महायुती नावाच्या नव्या समीकरणात भाजपसोबत सत्तेत आले. पण अंतर्गत धुसफुस मात्र संपलेली नाही. त्याचाच परिणाम म्हणून अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून एकनाथ शिंदे यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला टार्गेट केले जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारित आहे. याच विभागाला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातर्फे टार्गेट करण्यात आले आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विभागाचे मुख्य अभियंता नंदनवार यांना घेराव घालत आंदोलन केले. लहान व गरीब कंत्राटदारांना कामे दिली जात नाहीत. बड्या व धनाड्य कंत्राटदारांना निविदा मॅनेज करून कामे दिली जातात. अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू आहे, अशी टीका करण्यात आली.
अशा अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि ही साखळी तोडावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनामागे पवार व शिंदे गटातील धुसफूस कारणीभूत आहे, अशी चर्चा होत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्य अभियंत्यांचे कार्यालय गाठून त्यांना घेराव घातला. विभागातील काही अधिकारी १० टक्के कमिशन घेऊनच कामे देतात. त्या अधिकाऱ्यांकडे, त्यांच्या पत्नीकडे, मुलांकडे दोन दोन लाखांचे मोबाईल, महागड्या गाड्या कुठून आल्या? याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचे मिशन; मुलमध्ये होणार शासकीय तंत्रनिकेतन !
संबंधितांना निलंबित करण्यात यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. आठ दिवसांत याबाबत संपूर्ण माहिती मिळाली नाही तर याहीपेक्षा मोठा मोर्चा आणण्याचा इशारा देण्यात आला. आश्चर्याची बाब म्हणजे आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवरच सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. या आंदोलनामुळे शिंदेसेनेमध्ये नाराजीचा सूर असून जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांच्या विभागाला टार्गेट करण्यात येत असल्याची त्यांची भावना आहे. पुढील काळात शिंदेसेनेकडून राष्ट्रवादीविरोधातदेखील अशा प्रकारे आंदोलन होणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.