ajit-pawar-plane-crash-fir-demand-baramati-police-station-ncp-workers-protest : अजित पवार अपघात प्रकरणी गुन्हा नोंदवून सखोल चौकशीसाठी आक्रमक भूमिका
Baramati : बारामतीत अजित पवार यांच्या कथित विमान अपघात प्रकरणी सखोल चौकशी आणि गुन्हा दाखल करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली असून घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला आहे. “जो गेला तो साधा माणूस नव्हता, महाराष्ट्राचा तारणहार होता, तक्रार घेतलीच पाहिजे,” अशा घोषणा देत कार्यकर्ते हातात पोस्टर्स घेऊन आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.
या प्रकरणात सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित व्हीएसआर कंपनी तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी आमदार रोहित पवार पुढाकार घेत आहेत. त्यांनी यापूर्वी मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे निवेदन देत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आज ते बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी दाखल झाले. त्यांच्या सोबत अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार, युगेंद्र पवार तसेच मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते.
Rajya Sabha Election: महाराष्ट्रात 4 जागांसाठी भाजपमध्ये 25 इच्छुकांची शर्यत
राजेंद्र पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, अपघाताबाबत संपूर्ण आणि पारदर्शक माहिती जनतेसमोर येत नसल्यामुळे शंका निर्माण होत आहेत. लोकांना नेमके काय घडले याची स्पष्ट माहिती मिळाली पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. दुसरीकडे समर्थकांनी आरोप केला की काही शक्ती गुन्हा दाखल होऊ देत नाहीत. ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या दाव्यांवरही संशय व्यक्त करत त्यांनी या प्रकरणात घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले आहे.
युगेंद्र पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की व्हीएसआर कंपनीवर तातडीने गुन्हा दाखल व्हावा आणि सखोल चौकशी व्हावी. बारामतीतील नागरिक आणि समर्थक न्यायाच्या अपेक्षेने एकत्र आल्याचे त्यांनी नमूद केले. डीजीसीएच्या अहवालात ‘क्रिमिनल नेग्लिजन्स’चा उल्लेख असल्याचा दावा करत, जर मेंटेनन्समधील हलगर्जीपणामुळे अपघात घडला असेल तर संबंधितांवर फौजदारी कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
Uddhav Balaseb Thackeray : उद्धवसेनेला बुलढाण्यात धक्का? काँग्रेसच्या गळाला स्थानिक नेता!
दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे बारामतीतील वातावरण तापले असून पोलिसांकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अपघाताची चौकशी पारदर्शकपणे आणि वेगाने व्हावी, तसेच जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी, हीच मागणी आंदोलकांची आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात पोलिसांकडून निर्णय झाल्यास राज्याच्या राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.








