ajit-pawar-plane-crash-zero-fir-karnataka-investigation-maharashtra : कर्नाटकात झीरो एफआयआर, कटकारस्थानासह गंभीर गुन्ह्यांचे आरोप नोंद
Mumbai : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात मोठी घडामोड घडली असून कर्नाटकातील बेंगळुरू येथे पोलिसांनी ‘झीरो एफआयआर’ दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, हा अपघात केवळ दुर्घटना नसून मोठ्या गुन्हेगारी कटाचा भाग असल्याचा गंभीर आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्रात तक्रार नोंदवली जात नसल्यामुळे कर्नाटक पोलिसांकडे धाव घेण्यात आली होती आणि आता हा गुन्हा पुढील तपासासाठी बारामती ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
बेंगळुरूमध्ये नोंदवलेल्या या झीरो एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहितेअंतर्गत अनेक गंभीर कलमांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये खून, निष्काळजीपणामुळे मृत्यू, गुन्हेगारी कटकारस्थान, पुरावे नष्ट करणे तसेच बनावट कागदपत्र तयार करणे यांसारखे आरोप नमूद करण्यात आले आहेत. तक्रारीत विमान अपघातामागे तांत्रिक बिघाडापेक्षा अधिक गंभीर कारणे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
Eknath shinde : विधान परिषदेत अनपेक्षित सूर; एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा
एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार, विमानाच्या सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. उड्डाणाच्या वेळी आवश्यक दृश्यता मर्यादा पूर्ण होत नसतानाही लँडिंगला परवानगी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच विमानाच्या वापराच्या तासांमध्ये अधिकृत नोंदी आणि प्रत्यक्ष वापर यामध्ये विसंगती असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय, पायलटमध्ये शेवटच्या क्षणी बदल करण्यात आल्याची बाब आणि संबंधित पायलटचा शिस्तभंगाचा इतिहास याबाबतही शंका उपस्थित करण्यात आली आहे.
रोहित पवार यांनी २३ मार्च रोजी कर्नाटकात ही तक्रार दाखल केली असून, महाराष्ट्रात योग्य वेळी एफआयआर नोंदवला गेला नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. कर्नाटक पोलिसांनी झीरो एफआयआर नोंदवून तत्काळ कारवाई केल्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. आता या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांकडे सोपवण्यात आल्याने तपासाची जबाबदारी वाढली असून या प्रकरणात सत्य समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ‘झीरो एफआयआर’ ही संकल्पना अशी आहे की, गुन्हा कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला असला तरी तक्रार कोणत्याही पोलीस ठाण्यात नोंदवता येते. अशा एफआयआरला सुरुवातीला ‘०’ क्रमांक दिला जातो आणि नंतर संबंधित अधिकारक्षेत्रातील पोलीस ठाण्याकडे तो वर्ग केला जातो. यामुळे तक्रार नोंदवण्यात विलंब होत नाही आणि तातडीने तपास प्रक्रिया सुरू करता येते.
Ashok kharat case : खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे; अमानुष अत्याचारांची माहिती सभागृहात
या सर्व घडामोडींमुळे अजित पवार विमान अपघात प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पुढील तपासात नेमके काय निष्पन्न होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.








