Akola Municipal Election 2026 : काँग्रेस-उबाठा सेनेच्या निष्क्रियतेवर कडाडून टीका; अकोल्याच्या विकासासाठी महायुतीला साद
Akola आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात अकोल्याचे पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. “काँग्रेस आणि उबाठा सेनेचे सरकार राज्यात सत्तेत असताना त्यांना कामगारांच्या कल्याणासाठी ठोस योजना का राबवता आल्या नाहीत?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी महायुती सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजनांचा पाढा वाचला. राष्ट्रहित, समाजहित आणि अकोल्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस युतीला (महायुती) विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पालकमंत्री फुंडकर यांनी प्रभाग क्रमांक ४, ३, १९, १६ आणि ८ मध्ये झंझावाती दौरा करून मतदारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महायुती सरकारने जात-पात आणि धर्म न पाहता कामगार, शेतकरी आणि मातृशक्तीसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, काँग्रेस आणि उबाठा सेना या योजनांच्या विरोधात न्यायालयात जाऊन खोडा घालत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. “विरोधक केवळ गप्पांचा बाजार मांडून समाजात द्वेष निर्माण करत आहेत, अशा प्रवृत्तींपासून मतदारांनी सावध राहावे,” असे आवाहन त्यांनी केले.
Municipal Election : अकोल्यात भाजप – एमआयएम युतीचा दुसरा अंक!
यावेळी उपस्थित असलेले खासदार अनुप धोत्रे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून अकोला महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. “या विकासकामांतून शहराचा चेहरामोहरा तर बदलेलच, शिवाय स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्ष हा सक्षम आणि गतिशील शासन देणारा विश्वासाचा प्रतीक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
Rajmata Jijau : ४११ कोटींचा विकास आराखडा फक्त कागदावरच; ‘मातृतीर्थ’ सिंदखेड राजाकडे शासनाचे दुर्लक्ष
आमदार रणधीर सावरकर यांनी आपल्या भाषणात भाजपच्या विचारधारेवर प्रकाश टाकला. शेतकरी, कामगार आणि १२ बलुतेदारांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. “हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाचा विचार जपणारा आमचा पक्ष महापुरुषांच्या आणि संतांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहे. अकोला शहराच्या विकासासाठी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन आम्ही काम करू,” अशी ग्वाही त्यांनी दिली. या दौऱ्यामुळे अकोल्यातील राजकीय वातावरण तापले असून महायुतीने प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.








