व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Akola MIDC : उद्योग नाही, भूखंड मात्र ताब्यात; २६० धारकांना एमआयडीसीची नोटीस

Akola MIDC : उद्योग नाही, भूखंड मात्र ताब्यात; २६० धारकांना एमआयडीसीची नोटीस

Industries have still not commenced at several plots allotted for setting up industrial units : उद्योग सुरू करण्यासाठी एक महिन्याची मुदत, नंतर कारवाई

Akola महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) उद्योग उभारणीसाठी वितरित केलेल्या भूखंडांवर अनेक ठिकाणी अद्याप उद्योग सुरू झालेले नाहीत. भूखंड घेऊन त्यांचा वापर न करणाऱ्या धारकांवर आता महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अकोल्यासह जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रांमधील २६० भूखंडधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, एक महिन्याच्या आत उद्योग किंवा संबंधित व्यवसाय सुरू करावा अथवा भूखंड परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

उद्योग उभारणीला चालना देण्यासाठी १९७५ ते १९९० या कालावधीत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये एमआयडीसीकडून औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती करण्यात आली. यामध्ये अकोला, अकोला विकास केंद्र, मूर्तिजापूर, अकोट, बाळापूर, तेल्हारा आणि पातूर येथील औद्योगिक क्षेत्रांचा समावेश आहे. या क्षेत्रांमध्ये औद्योगिक, व्यावसायिक तसेच निवासी स्वरूपाचे भूखंड वितरित करण्यात आले आहेत.

मात्र, भूखंडांचे वाटप होऊन अनेक वर्षे उलटूनही काही भूखंडांवर उद्योग किंवा व्यवसाय सुरू झालेले नाहीत. त्यामुळे संबंधित भूखंडांचा अपेक्षित वापर होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. भूखंड अडवून ठेवण्याऐवजी त्यांचा प्रत्यक्ष वापर व्हावा, यासाठी महामंडळाने आता भूखंडधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये आतापर्यंत २,३८२ भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी २६० भूखंडधारकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

Akola Congress : काँग्रेसची नवी कार्यकारिणी ॲक्शन मोडमध्ये; जि.प.-पं.स. निवडणुकांसाठी ‘मिशन संघटन’!

नोटीस बजावल्यानंतरही संबंधित भूखंडधारकांनी कोणतीही कार्यवाही केली नाही, तर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. भूखंडाचा वापर न करणाऱ्या धारकांकडून तो परत घेऊन, उद्योग उभारणीस इच्छुक असलेल्या नव्या उद्योजकांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया एमआयडीसीकडून राबविण्यात येत आहे. त्यामुळे नोटीस मिळालेल्या भूखंडधारकांसमोर आता भूखंडाचा प्रत्यक्ष वापर करण्याचे किंवा तो महामंडळाकडे परत करण्याचे आव्हान आहे.

error: Content is protected !!